Monday, March 12, 2012

कं पोस्ट ३ - अर्थात कचर्‍यातून घेतलेले धडे

या उद्योगाविषयी मी इथे आणि इथे लिहिलंय. हा यातला शेवटचा भाग.

या चुकत - माकत केलेल्या प्रयोगातून मिळालेले धडे:
१. फ्लॅटवासियांनी पहिला प्रयोग करताना शक्यतो कोणा जाणकाराच्या मार्गदर्शनाखाली करावा. योग्य काळजी घेतली नाही तर घरात चिलटं, डास, किडे होण्याची  आणि आपण पुन्हा कंपोस्टिंगच्या वाटेला न जाण्याची शक्यता आहे.

२. डबे घासून रंग काढताना चांगलाच घाम निघाला. त्यामुळे डबे बाहेरूनही घासून चकाचक पांढरे करायचे आणि त्यावर मस्त वारली चित्र काढायची हा कलात्मक बेत रद्द करावा लागला. पण नंतर डब्याचा तळ कापण्याच्या ठोकाठोकीत हे रंगाचे उरलेले लपके इतके पटापट सुटे होत होते - पुन्हा हा प्रयोग केला, तर आधी डबे कापणार, मग उरलेला रंग घासणार.

३. ओला कचरा म्हणजे काय हे घरातल्यांना, कामवाल्या बाईला समजायला आणि पटायला हवंय. किती सांगितलं तरी अधून मधून कंपोस्ट बिनमध्ये प्लॅटिकच्या पिशव्या आणि ऍल्युमिनियम फॉईलचे तुकडे निघतातच.

४. कचरा कुजताना त्यातून पाणी गळतं. हे पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यायला हवी. पाणी साचून राहिलं तर दुर्गंधी आणि माश्या, डास होण्याची शक्यता आहे. कंपोस्ट बिन तुम्ही अगदी घरात सुद्धा ठेवू शकता असं तज्ञ म्हणतात. पण मला तरी कुठलंच डिझाईन या गळणार्‍या पाण्याची पूर्ण काळजी घेतं आहे असं वाटलं नाही. त्यामुळे कंपोस्ट बाल्कनीमध्ये ठीक आहे, घरात नको. (बाल्कनीत  एका पसरट, उथळ कुंडीत कोरडी माती ठेवून मी ती कंपोस्टच्या स्टॅंडखाली ठेवून दिली त्यामुळे या पाण्याचा त्रास झाला नाही.)

५. कंपोस्ट लवकर होण्यासाठी खरं म्हणजे दोन महिन्यांनी त्यात गांडुळं सोडायला हवी. (गांडुळं बिनमधून बाहेर पडत नाहीत. सूर्यप्रकाशात त्यांची त्वचा कोरडी पडते आणि ती मरतात.) पण याला घरच्या ५०% लोकसंख्येचा तीव्र विरोध होता. त्यामुळे वेळ लागला तरी चालेल, पण मायक्रोबनाच हे काम करायला लावायचं असं ठरवलं. गांडुळं वापरली तर चहासारखं दाणेदार, एकसारखं दिसणारं खत मिळतं. मायक्रोबने केलेल्या कंपोस्टला हे टेक्श्चर नसतं.

६. कंपोस्ट बनत असताना त्यात बारीक किडे झाले होते. हे किडे बिनच्या बाहेर पडत नाहीत. पण नवरोबाने किडे बघितल्यावर बिनचं झाकण घट्ट बंद करायला सुरुवात केली. हवा खेळती राहणं बंद झाल्यावर किडे अजून वाढले. त्यावर माती टाकल्यावर जास्तीची ओल शोषली गेली, किडे कमी झाले.

७. आंब्याच्या कोयी कुजायला खूप जास्त वेळ लागतो. शक्यतो आंब्याच्या कोयी घरातल्या कंपोस्ट बिन मध्ये टाकू नयेत.

८. कंपोस्ट बिन उघड्यावर ठेवणार असाल तर झाकण लावायला विसरू नका - कबुतरं, कावळे कचरा पसरून ठेवतात.

९. डेली डंपचं डिझाईन खरोखर मस्त आहे. जागा कमी लागते, तयार कंपोस्ट वेगळ्या डब्यात असल्यामुळे अर्धवट कुजलेल्या कचर्‍यातून वेगळं करत बसावं लागत नाही, आणि कचर्‍याला सुटणारं पाणी खालच्या खतात बर्‍याच अंशी सामावलं जातं.

१०. कचरा पहिल्या दिवशी दिसतो त्यापेक्षा खूप कमी होतो. सुरुवातीला मला रोज वाटायचं - या आठवड्यानंतर डबा भरणार, दुसरा डबा सुरू करावा लागणार. पण आठवडाभराने पुन्हा कचरा जुन्या पातळीलाच असायचा!

११. प्रयोगासाठी लागणारा वेळ : बिन तयार करणे - एक दिवस. त्यानंतर रोज दोन मिनिटं, आणि आठवड्यातून एकदा दहा मिनिटं.

१२. प्रयोगाचा खर्च -
  • सकाळ फुलोरा कार्यशाळा - १०० रु. (खरं तर मी फुलोरा चे वर्षभराचे पैसे भरले होते. पण वर्षभरातल्या पाच कार्यशाळांपैकी या एकाच दिवशी जाता आलं मला. तो एक दिवस सत्कारणी लावला असं नंतर मनाचं समाधान करून घेतलं ;) )
  • रंगाचे रिकामे डबे - १०० रु ला एक, एकूण २०० रू.
  • स्टॅंड - आईकडून दान
  • मायक्रोबॅक्टेरिअल लिक्वीड आणि मिक्श्चर - सुमारे ५० रू (लिक्वीड अजून भरपूर शिल्लक आहे)
  • गार्डन स्प्रे - ६० रू (रोज लिक्वीडची फवारणी करायला)
अन्य साहित्य:
  • तिखट पावडर - साधारण १० -१२ चमचे
  • खायचा सोडा - १० -१२ चमचे (जुनं, खराब झालेलं इनो वापरलं)
१३. "काय मस्त भाज्यांची देठं जमली आहेत तुझ्याकडे - मी घेऊन जाऊ का खतात घालायला?" असं आईला म्हणण्याचा मोह झाला तरी टाळावा. आपल्याला कंपोस्टिंग प्रकल्पाने झपाटलं असलं, तरी बाकी जग नॉर्मलच चालत असतं. त्यामुळे आल्यागेल्या पाहुण्यांना उत्साहाने कंपोस्ट बिन उघडून दाखवू नये.  :D
***************************
पहिल्या पोस्टीत म्हटलंय तसं हा प्रयोग माफक प्रमाणात यशस्वी झाल्याचं मी घोषित केलंय. सद्ध्या फक्त बागेतल्या कचर्‍याचं कंपोस्टिंग चाललंय. जरा बाल्कनीतलं ऊन, पाऊस आणि कंपोस्टिंगला लागणारा वेळ याचं गणित जुळवायचा प्रयत्न आहे. तो जमला, की पुन्हा सगळा ओला कचरा यात वापरता येईल.

10 comments:

Abhishek said...

छान! निसर्गाकडे परत जाण्याचा आनंद मिळाला!

Gouri said...

अभिषेक, हे सगळं लिहून आपण वाचणार्‍यांना बोअर करतोय, त्यामुळे लिहावं का नाही असा विचार करत होते. पण झालाच तर कुणाला कदाचित त्याचा उपयोग होईल, म्हणून शेवटी टाकलं :)

Anagha said...

आमचे जाणकार मुंबईत रहात नाहीत ! ते कधी येतील आमच्याकडे....आम्हांला शिकवायला ?? :) :)

Gouri said...

जाणकार मुंबईला कधीही येतील. फक्त त्या दिवशीचा मेन्यू आधी माहित हवा ... आणि त्यात पापलेट असून काही उपयोग नाही :)

Anagha said...

हम्म्म्म...खीरपुरी, पावभाजी...असा माझ्या ज्ञानात फार मर्यादित शाकाहारी मेन्यू येतो ! :D

Gouri said...

चालेल :)

हेरंब said...

हमारा कंपोस्ट तुम्हारे कंपोस्ट से लय सोपा हय.. ;)

Gouri said...

हेरंब, अरे अवघड काम आपण नाही करत ... आपण फक्त वाट बघयची :)

अपर्णा said...

लेट कमेंट देते आहे पण मी तिन्ही पोस्ट एकदम वाचल्यात...त्यामुळे सगळ्यात आधी मोठा दंडवत....:)
तुझ्याकडून अजून कुठले धडे बाकी आहेत ग याचा विचार करते....आणि सगळ एका लिस्ट मध्ये लिहितेय....
बाकी या वर्षी(पण) फार्मविले करूया नको असं काही सुरु होतं पण ही पोस्ट वाचून जरा मत बदलायचं म्हणते...पाठवतेस का थोडं खत आमच्याकडे...:D

Gouri said...

अपर्णा, :)
अग, पुढच्या कंपोस्टिंग सायकलमध्येसुद्धा अजून धडे शिकायला मिळतील ;)
वेळ कमी असेल तर कमी निगा लागणार्‍या भाज्या लाव ग, पण फार्मविले कर नक्की.