तीन वेळा परतीचं तिकीट बदलूनही कोरापूट पोटभर बघून झालंय असं वाटत नाही. दर वर्षी इथे ‘परब’ नावाचा आदिवासी सांस्कृतिक महोत्सव असतो. परब बघायला परत यायचं असा बेत करतच कोरापूट सोडलं. येतांना विशाखापट्टण - कोरापूट रस्त्याच्या सृष्टीसौंदर्याला न्याय देता आला नव्हता. त्यामुळे परत जातांना रस्त्याचे मनसोक्त फोटो काढले.
या डोंगराळ भागात आदिवासी वस्ती विखुरलेली आहे. जेमतेम आठ - दहा घरांचा एक पाडा - आजूबाजूला फक्त डोंगर. अश्या एकेका वस्तीपर्यंत रस्ते - वीज - पाणी - आरोग्यकेंद्र - आंगणवाडी - शाळा पोहोचवायची, म्हणजे जितका खर्च येईल, तितकाच खर्च अन्यत्र एखाद्या पाचशे - हजार लोकवस्तीच्या खेड्यासाठी येईल. नुसत्या रिपोर्टमध्ये वाचून कदाचित ही मागणी अवास्तव वाटेल,पण प्रत्यक्ष बघितल्यावर मात्र इथे विकासासाठी जास्त पैसा का घालायला हवा हे अगदी पटतं.
आदिवासी पाडा |
आंध्र - ओडिशा सीमा |
पंधरा दिवस दिवस रात्र संधी मिळेल तेंव्हा गप्पा मारूनही गप्पा संपलेल्या नसतात. त्यामुळे आमचा प्रवास एकाच गाडीतून चाललेला असतो - कलेक्टरांची लाल दिव्याची गाडी मागून रिकामी येत असते. :)
आमच्या मागून येणारी लाल दिव्याची एस्कॉर्ट कार :) |
हा प्रवास एखाद्या टाईम मशीनमध्ये बसून केल्यासारखा वाटतो. शतकानुशतकं गोठल्यासारखे एकाच स्थितीत राहिलेलं कोरापूटचं आदिवासी जनजीवन, घनदाट जंगलं, डोंगरदर्या संपून अचानक आपण एकविसाव्या शतकात पोहोचतो. जणू काही हा बदल ठळक करण्यासाठीच आंध्र किनारपट्टीलगतच्या या भागात नजर जाईल तिथपर्यंत फक्त सपाट शेतं आणि बांधावर ताडाची झाडं नजरेला पडतात.
डोंगर संपले, ताडाची झाडं आली, आंध्रात पोहोचलो. |
परततांना थेट पुण्याला येण्याऐवजी हैद्राबादला उतरून पोचमपल्ली बघून परत येण्याचा बेत असतो. कोरापूट आणि पोचमपल्ली दोन्ही नक्षलग्रस्त भाग. कलेक्टरांकडून घेतलेलं ‘रेड सन’ वाचता वाचता दोन्ही भागांची तुलना करायची संधी असते.
8 comments:
Thanks for introducing Orrisa from your camera...... And its good; as a guide for us to visit next time.... Thanks a lot...
रोहित, सगळ्या पोस्टी वाचून त्यावर आवर्जून प्रतिक्रिया दिल्याबद्दल आभार! :)
हं.. आता पुढचा कोणत्या राज्याचा दौरा आहे? कोरापुटच्या सर्किट हाऊसला विनोबा भावे यांनी भेट दिली होती (ते तिथं राहिले होते) अशी एक आठवण आहे. आणि कोरापुटमध्येच एक जगन्नाथ मंदिर आहे - ते पाहिलं का?
कोरापूटचं सर्कीट हाऊस बघितलं. सुंदर लोकेशन आहे ... पाऊस पडत असताना तिथे बसून भजी आणि कॉफीचा आस्वाद घेणं म्हणजे सुख आहे! :)
जगन्नाथ मंदिरात नव्हता ... रथजात्रा चालू होती, त्यामुळे रथातच दर्शन झालं जगन्नाथाचं.
कोरापूटचं ट्रायबल म्युझियम मात्र बघता आलं नाही. पुढचा दौरा संधी मिळेल तिथे ... मला वाटतं, बघण्यासारखं सगळीकडेच खूप आहे, आपल्याला माहित नसतं फक्त. :)
मला काही वेगळंच आठवलं. कामानिमित्ते एकदा गुजरात, आंध्र आणि महाराष्ट्र ह्यामधील बऱ्याच आतल्या गावांना मी भेट दिली होती. त्यावेळी मला सर्वात स्वच्छ आणि सुधारलेला गुजरात वाटला होता. अतिशय अस्वच्छ आंध्र होता आणि बेताची परिस्थिती महाराष्ट्राची होती.
अनघा, असा विचारच नव्हता केला मी. ओरिसा एकूणात फारच आस्वच्छ आहे ... पण यावेळी मी बघितल्या त्या प्रामुख्याने आदिवासी वस्त्या. आणि इथली आदिवासी गावं अतिशय स्वच्छ असतात. मागे गडचिरोलीलासुद्धा आदिवासी गावं जी बघितली ती एकदम चकाचक होती. (सगळीच आदिवासी गावं अशी असतात का?) त्या मानाने आन्ध्रातली गावं अस्वच्छ वाटली.
आज एका मागोमाग इक असे सगळे भाग वाचून काढले..
मस्तच...
म्हणजे तिथल्या सद्य समाज परिस्थितीपासून ते निसर्ग, झाडे, लोक, कला सारेच सहज सहज येणारे ..
अनघाच्या तुर्की टूर नंतर ओरिसाची सहल...घर बसल्या... :)
भक्ती
भक्ती, आवर्जून सगळे भाग वाचलेस म्हणून छान वाटलं :)
Post a Comment