कॉफी प्लांटेशन? आणि ओरिसामध्ये? आश्चर्यच वाटलं मला. मग समजलं, की कोरापूटच्या कलेक्टरांच्या बंगल्याच्या आवारातच दोन किलो कॉफी होते! इथली हवा आणि जमीन कॉफीला अगदी योग्य आहे. तिथलं एक कॉफी प्लांटेशन बघायची संधी मिळाली.
|
प्लांटेशनचं गूढरम्य वातावरण |
खाली हिरवीगार कॉफीची झाडं, त्यांच्यावर सावली धरणारे सिल्व्हर ओक, त्यावर चढवलेले मिरीचे वेल, धुकं आणि हलका पाऊस. इथल्या वातावरणात एकदम अचानक ब्रेव्हहार्टमधला मेल गिब्सन घोड्यावरून जातांना दिसेल असं वाटतं. :)
|
ही वाट दूर जाते, स्वप्नामधील गावा ... |
ओरिसात स्थायिक झालेल्या एका तेलुगु कुटुंबाचा आहे हा मळा. नवरा बायको आणि त्यांचा कुत्रा असं तिघांचं कुटुंबं इथे राहतं. मुलं कधीतरी सुट्टीला येतात. नवरा बाहेरची सगळी कामं बघतो, आणि ही बाई एकटी प्लांटेशनचं काम बघते. कामाला येणारे मजूर वस्तीला नसतात. एवढ्या मोठ्या प्लांटेशनमध्ये सोबत फक्त कुत्र्याची. (केतकर वहिनांची आठवण झाली ऐकताना.) प्लांटेशनमध्ये त्यांनी हौसेने भरपूर वेगवेगळी झाडं लावली आहेत. पावसात भिजत, चिखलात ती सगळी झाडं बघायला आम्ही सगळ्या प्लांटेशनमध्ये हिंडलो. त्यांना फक्त तेलुगू आणि ओडिया भाषा येते, मला दोन्ही समजत नाहीत. पण थोड्या वेळाने दोघींचा झाडांच्या भाषेत संवाद सुरू झाला. :)
आम्ही गेलो तेंव्हा कॉफीची फुलं गळून हिरवी फळं धरलेली होती. इथे पारंपारिक भारतीय कॉफीमळ्याबरोबरच त्यांनी ऑस्ट्रेलियन पद्धतीने (सावली न करता) कॉफी लावण्याचाही प्रयोग केलाय. सावलीला झाडं ठेवली नाहीत, तर कॉफीला बारा महिने पाणी घालावं लागतं.
प्लांटेशनवर चंदनाची बरीच झाडं आहेत.
|
चंदन |
रक्तचंदनाचं झाड मी प्रथमच बघितलं.
|
रक्तचंदन |
महोगनीचं झाड
|
मोहोगनी |
तमालपत्राची कोवळी गुलाबी पानं
|
तमालपत्र |
आणि हा शिसव / रोझवुड
|
शिसव |
व्हॅनिलाचा वेल
|
व्हॅनिलाचा वेल |
खास ऑस्ट्रेलियाहून आणलेला ऑक्टोपस ट्री
|
ऑक्टोपस ट्री |
झाडाखालची मश्रूम्स
|
भूछत्र |
त्यांच्या मळ्यातलं, त्यांना ओळखू न आलेलं एक झाड आम्ही ओळखलं :)
|
नागकेसर |
तंदूरी चिकनचा लाल रंग कृत्रीम असतो असा माझा समज होता. जाफ्रा नावाच्या झाडाच्या बिया पाण्यात टाकून हा रंग बनतो ही नवीनच माहिती मिळाली. या झाडाला आपल्याकडे कोकणात रंगराज म्हणतात हेही नव्यानेच समजलं. हे जाफ्राचं झाड:
|
जाफ्रा किंवा ’रंगराज’ |
आणि ही त्याची वाळलेली फळं:
|
जाफ्राची वाळलेली फळं |
कापूर झाडापासून मिळतो याचाही मला गंध नव्हता. हे त्यांच्याकडचं कापराचं झाड:
|
कापूर |
इथे कॉफी इतकी चांगली होऊनही कॉफीचे मळे फारसे नाहीत असं का? इथली जमीन प्रामुख्याने आदिवासींच्या मालकीची आहे. त्यांच्याकडच्या जमिनीचे तुकडे आकाराने इतके लहान आहेत, की कॉफी प्लांटेशन परवडणार नाही. (इकॉनॉमिकली व्हायेबल नाही.) कॉफीला खूप लक्ष द्यावं लागतं, आणि कुशल मनुष्यबळ लागतं. ते उपलब्ध नाही. आदिवासींच्या जमिनी बिगरआदिवासींना विकता येत नाहीत. सरकारने सहकारी कॉफी मळ्यांची एक योजना आणली, पण ती यशस्वी झाली नाही.
6 comments:
तुझ्यामुळे झाडांविषयी माझ्या माहितीत भर पडत चालली आहे ! :)
तमालपत्र सुंदर आहे ! तू नागकेसर ओळखलंस वाटतं ? :)
सरकारी योजना यशस्वी का झाली नाही ?
(हा माझा प्रश्र्न म्हणजे ते आपल्या शाळेतल्या धड्यांखाली असे प्रश्र्न असतात ना ? तसं मला वाटतंय ! :p :) )
अनघा, तमालपत्राची पालवी इतकी सुंदर दिसते हे मला माहित नव्हतं. ते फूल बघून मला उगीचच वाटलं की हे नागकेसर असेल, आणि ते खरंच नागकेसर निघालं :)
इथल्या लोकांमध्ये एकूणात आपण काही करण्यापेक्षा सरकारने आपल्याला काही द्यावं अशी भावना जास्त आहे. दोन रुपये किलो तांदूळ सारख्या योजना राबवून सरकारने त्यांच्या आळशीपणाला खतपाणी घातलंय. सहकार चळवळ इथे रुजलेली नाही. त्यामुळे सहकारी कॉफी मळे चालले नसावेत असं मला वाटतं.
बघ, ‘तीन ते चार वाक्यात उत्तरे लिहा’ मध्ये चालण्यासारखं उत्तर दिलंय मी ;)
इथे तू कमेंट मधे (३-४ वाक्यांत!) लिहील आहेस, ते वाचून मन जरा खट्टू झाल... त्यांना बऱ्याच गोष्टी पुरवणार सरकारी लोकं भेटले आहेत तर ही लोकं आळशी झाली आहेत. आपल्याकडे तर योजनाच पोहोचत नाहीत आणि कामं करायला बरीच लोकं तयार असतात. खरंच अस आहे का!
बाकी झाडांच्या माहितीची कास काही सुटत नाही! फोटो साठी पंकजला घेऊनच जा पुढच्यावेळी.
अभिषेक, हे लोक मुळातच आळशी असावेत असं वाटतं. त्यांच्या सुदैवाने सद्ध्या अतिशय उत्साही आणि या भागाची जाण असणारे अधिकारी त्यांना मिळालेत, पण उच्च स्तरावर आखलेल्या योजनांचा हेतू चांगला असला, तरी परिणाम अपेक्षेप्रमाणे साधेलच असं नाही.
नव्या झाडांची ओळख करून घ्यायला मला आवडतं. इथे तर भर पावसात हिंडून झाडं दाखवायला तयार असणार्या जाणत्या मार्गदर्शक भेटल्या :)
मागेच म्हटलं होतं नं मी तुला "गल्ली चुकलंय" म्हणून..:P
माझा झाडांचा क्लास कधी घेतेयस?
मागे आम्ही हवाईला गेलो होतो तिथे मी कोना कॉफ़ी आठवणीने घेतली पण मळ्यांच्या वाटेने जायच्या ऐवजी सरळ बीचवर हुंदडलो...:) असो ती भर आता तुझ्या कॉफ़ी पोस्टनी भरुन काढतेय....;)
अपर्णा, सद्ध्या गल्ली श्गोधत भटकणं चाललंय. :)
झाडांचा क्लास आपण दोघी लावू कुणाचातरी म्हणजे जास्त शिकायला मिळेल, नाही का?
Post a Comment