Monday, October 12, 2015

पाठवणी


कुंड्यांमधली बाग सुरू केली तेंव्हा पहिल्यांदा जी वीस – बावीस झाडं आणली त्यातला एक माझा सोनचाफा. गेली सहा वर्षं तो माझ्या एवढ्याश्या टेरेसवर भरभरून फुलतोय, सुगंधाची लयलूट करतोय. अगदी सुरुवातीला आमच्या समोरची इमारत झालेली नव्हती आणि टेरेसवर भन्नाट वारं यायचं, आणि अश्या वेड्या वार्‍यात हा कसा टिकेल म्हणून मला शंका वाटायची. पण तो नुसता टिकलाच नाही, तर फुलतही राहिला. टेरेसवर पहिल्यांदाच बाग करत असल्यामुळे तिथे मिळणार्यात सूर्यप्रकाशात उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात किती फरक पडतो याची सुरुवातीला अजिबात कल्पना नव्हती. पाणी, सूर्यप्रकाश, खत सगळंच अजून शिकत होते मी. पण शिकाऊ माळीणबाईंना सांभाळून घेतलं त्यानं. 

त्याला आलेलं पहिलं फूल, त्याची सुरुवातीची पानं, ही “सुवर्णरेखा” जात आहे, हिची पानं अशीच असतात हे माहित नसल्यामुळे त्या पानांच्या वळलेल्या कडा पाहून माझी काळजी, पहिल्यांदा छाटणी करतानाची धाकधूक, खूप दिवस घराबाहेर राहून आल्यावर घरी आल्यावर अर्ध्या रात्रीसुद्धा बागेत काय चाललंय ते बघण्याची धडपड हे सगळं आज आठवतंय.

बागेत सगळ्यात जास्त गप्पा मी त्याच्याशी मारल्यात,  आणि आपण सांगितलेलं – न सांगितलेलं सगळं त्याला समजतंय याचाही अनुभव घेतलाय! अशीच एकदा एका निर्णयाची मोठी जबाबदारी वाटत होती. सगळं नीट होईल ना याची काळजी होती. अस्वस्थ आणि एकटं वाटत होतं. हे सगळं त्याच्याजवळ व्यक्त केलं, आणि भर उन्हाळ्यात, माझं तसं दुर्लक्षच होत असताना माझ्या एवढ्याश्या झाडाला त्या दिवशी तब्बल वीस फुलं आली! माझं झाड माझ्याशी बोलतं यावर त्या दिवशी माझा ठाम विश्वास बसला.

धाकटं भावंड स्वीकारणार्‍या समजूतदार मोठ्यासारखं त्याने माऊ आल्यावर मला बागेसाठी पूर्वीसारखा वेळ न देता येणंही मान्य केलंय. 
या एका झाडाने मला किती आनंद दिलाय ते शब्दात सांगणं शक्य नाही! इथे ब्लॉगवरच त्याच्या किती पोस्ट आहेत हे आज जाणवलं.

असं सगळं मस्त चाललं असताना एकीकडे एक टोचणी लागून होती ... कितीही मोठी कुंडी असली तरी सोनचाफ्याला ती आयुष्यभर पुरणार नाहीये. त्याच्या पूर्ण क्षमतेवढं मोठं होण्यासाठी त्याला मोकळ्या जमिनीत रुजायची संधी मिळायला हवीय. पण झाड मोकळ्या जमिनीत लावताना मला त्याच्याजवळ राहता येणार नाही! त्याला असं घर सोडून दूर पाठवायची मनाची तयारी काही होत नव्हती. दोन – चार ठिकाणी मी झाड लावता येईल का म्हणून चौकशीही केली, पण त्या चौकशीत खरा जीव नव्हताच. आणि एक दिवस अचानक नवर्‍याने सांगितलं – “मी सोसायटीमध्ये विचारलंय. आपल्या इथे खाली झाड लावायला जागा शोधणार आहेत ते.” फार दूर नाही म्हणून आनंद, पण आता खरंच जाणार म्हणून दुःख असं चाललं होतं मग. मग सोसायटीचे लोक येऊन झाड पसंत करून गेले. एक दिवस माळीदादाही झाड बघायला आले. पण तेंव्हा झाडाला भरभरून पालवी आली होती, आणि कळ्याही. हा बहर संपल्यावर झाड हलवू या असं ठरलं, आणि हा बहर कधी संपूच नये असं मला मनाच्या कोपर्‍यात वाटायला लागलं! त्यात त्याच्यासाठी शोधलेली जागा म्हणजे केवडा आणि फणसाचं झाड काढून तिथली मोकळी जागा. मस्त वाढलेला केवडा आणि फणस का तोडायचा? (उद्या असाच माझा सोनचाफा तोडला यांनी तर? सोसायटीचं कुणी सांगावं! :( परत शंका!) तो बहर संपलाच शेवटी, पण मग पावसाची दडी, सोसायटीच्या बागेला पाणी पुरवणारी मोटर जळाली अशा विविध कारणांनी त्याचा मला अजून महिनाभर सहवास मिळाला. मग दोन वेळा झाड घ्यायला आलेले माळीदादा घरात कोणी नाही म्हणून परत गेले, आणि अखेरीस झाडाच्या पाठवणीची वेळ आलीच!
दुपारी माऊ झोपलेली असताना इतक्या झटकन नेलं त्यांनी झाड, की मला नीट निरोपही घेता आला नाही. माऊ उठल्यावर तिला सांगितलं, “आपलं झाड गेलं खाली!”
“खाली कुठे?”
“माहित नाही! मला माळीदादा दिसतच नाहीयेत खिडकीतून. आपण शोधू खाली जाऊन.”
“आई ते बघ माळीदादा झाड लावताहेत तिथे खाली!” माऊला दिसले ते बरोब्बर.

अगदी माझ्या खिडकीच्या खाली जागा मिळाली सोनचाफ्याला - लांबून का होईना, पण रोज दिसणार तो मला. अगदी खाली जाऊन गप्पा सुद्धा मारता येतील! टेरेसवरच्या त्याच्या रिकाम्या जागेकडे बघून रिकामंरिकामं वाटलं की फक्त खिडकीतून एकदा खाली बघायचं! :) जीव भांड्यात पडणं म्हणतात ते हेच!

5 comments:

Anagha said...

बाप रे!!!! मला कळतंच आहे तुला काय वाटलं असणार ते !!!!!!!!!!

Gouri said...

हो ग अनघा ... तू अनुभवलंच आहेस हे!

Kavs said...

Tujhya sarkhi halvya manachi, premachi maitrin milalyavar tujha chapha bolla nasta tarach naval hote... Mala radu ale ga post vachun...:(

Gouri said...

Kavs, तुला आनंदाची बातमी सांगते. नव्या जागेत रुजतोय चाफा. आज गावाहून आल्यावर त्याला भेटले, तर एक फूल आलं होतं त्याला!!! Happy!!!

Kavs said...

Arre wah! Bara jhala ani thanks, anandachi baatmi dilyabaddal :)