Thursday, October 15, 2015

Heidi

माऊच्या एका आज्जीने तिच्यासाठी सुंदर सुंदर पुस्तकं पाठवलीत. यातली सगळीच तीन वर्षाच्या पिल्लाला लगेच वाचता येण्यासारखी नाहीत, पण लहानपणी जे जे वाचायला मिळायलाच हवं असं तिला वाटलं त्यातली सापडतील ती पुस्तकं तिने पाठवलीत. त्यात Winnie the Pooh (डिस्नेचा नाही, मूळ कॅनडाचा) आहे, Anne of the green gables आहे, आणि Heidi पण आहे. अनघाकडून मी हायडीविषयी ऐकलं होतं, पण तिने दाखवलं तश्या सुंदर चित्रांचं पुस्तक मला सापडलं नव्हतं त्यामुळे ते वाचलेलं नव्हतं. आजीच्या पुस्तकात चित्रं नाहीत, पण गोष्ट तर वाचायला मिळाली त्यामुळे. आजीच्या मते युरोपातल्या मुलांचं बालपण ज्या गोष्टींशिवाय पूर्ण होऊच शकत नव्हतं त्यापैकी हायडी एक आहे.



स्वीस आल्प्समधल्या एका डोंगरावर आजोबांसोबत राहणारी छोटीशी हायडी. तिला शहरातल्या एका श्रीमंत घरात रहायची संधी मिळते, पण आपली डोंगरावरची झोपडी, आजोबा, शेळ्या राखणारा पीटर आणि सगळ्या शेळ्या, पीटरची आजी – आणि या सगळ्याहूनही डोंगर, तिथली रानफुलं, कुरणं, सूर्योदय आणि सूर्यास्त – हे सगळं नितांतसुंदर जग हायडी विसरू शकत नाही. या सगळ्यासाठी झुरणार्‍या हायडीला अखेरीस घरी परत येण्याची संधी मिळते. तिची शहरातली श्रीमंत घरातली पंगू मैत्रीण तिला भेटायला येते आणि इतक्या सुंदर आणि आरोग्यपूर्ण वातावरणात एकदम तंदुरुस्त होऊन जाते. हायडीमुळे डोंगराखालच्या गावापासून फटकून राहणारे हायडीचे आजोबा गावकर्‍यांकडे परत जातात. पीटरच्या गरीब आजीच्या झोपडीची डागडुजी होते, तिला चांगलं खायला मिळतं, उबदार बिछाना मिळतो. हायडीमुळे पीटर लिहायला – वाचायला शिकतो. (आणि सगळे सुखाने रहायला लागतात :D) अशी थोडक्यात गोष्ट. एका दृष्टीने परिकथाच. पण आवडली.

लहान मुलांसाठीचं पुस्तक, त्यामुळे यात कुठल्याच पात्राच्या स्वभावात कंगोरे नाहीत. हायडीही  पेठ्यासारखी गोडमिट्ट आहे. तिला हाडामांसाची, जिवंत बनवायला उद्याची चिंता, नसलेल्या आईवडिलांची आठवण, हेवेदावे, एखादं भांडण, भीती, कुठलीच अपरिपूर्णता यात दाखवलेली नाही. पण तरीही आवडलीच ती. तसं बघितलं तर डोंगरावरच्या हायडीच्या आयुष्यात क्वचितच काही घडत असतं. रोजचा सूर्योदय, डोंगरावर फुलणारी रानफुलं, पीटरच्या बकर्‍या हे सगळं तिथे तसं रोजचंच. हे सगळं रोज नव्याने अनुभवणं, त्यात रोज आनंद शोधणं, तो इतरांपर्यंत पोहोचवणं हायडीला जमतं. रोजच्या जगण्याला असं सुंदर बनवण्यासाठी आपल्याला स्वित्झर्लंडमध्ये आल्प्सच्या डोंगरातच रहायला हवं असं नाही. तिथे राहणार्‍या सगळ्यांना तरी ते डोंगर इतके सुंदर कुठे वाटतात! प्रश्न आहे तो सुंदर क्षण टिपण्याची दृष्टी मिळवण्याचा.

4 comments:

Raj said...

मस्त. मला लहान मुलांचा हेवा वाटतो, अशी पुस्तकं बघितली कि. मोठं झाल्यावर फारच सिनिकल होता जातो आपण, निर्भेळपणे
आस्वाद घेता येत नाही.

Gouri said...

हो ना ... हे लहानपणी वाचायला अजून किती मजा आली असती असं वाटलंच :)

Anagha said...

हायडीचा आनंद मी माझ्या लेकीबरोबर घेतलाय. जेव्हा ती हायडीच्या वयाची होती ! आणि म्हणून तर हायडीला माझ्या आयुष्यात अढळ स्थान आहे ! :) :)

Gouri said...

अनघा, मस्तच पुस्तकाची ओळख करून दिलीस तू! माऊ हायडीच्या वयाची झाली की तिच्याबरोबर परत वाचेन :)