Monday, February 8, 2016

अजून एक फसलेला प्रयत्न

    माऊबरोबर पुस्तकं तशी बरीच वाचली जातात, आणि गाणी पण ती आवडीने बघते. पण बाकी टीव्ही, जाहिराती आणि कार्टून प्रकारापासून तिला तसं लांबच ठेवलंय आतापर्यंत. अधूनमधून एखादा सिनेमा तिच्याबरोबर बघायचा प्रयत्न असतो. काल माऊबरोबर “Finding Nemo” बघू या म्हटलं. जेमतेम १५ मिनिटं बघितला असेल तो आम्ही.

    “आई, त्या पिल्लाची आई कुठंय?”
    “त्याच्या आईला त्या मोठ्या माश्याने खाऊन टाकलं.”
    “का?”
    “त्याचा खाऊ आहे तो बाळा. मोठा मासा छोट्या माश्याला खातो!”
    “आई, त्याची आई कुठेय? आई हवी!”
    “अग, तो बाबाबरोबर किती छान खेळतोय बघ!”
    “नाही, आई पाहिजे!”

    असं म्हणून पहिल्या मिनिटाला जे रडं सुरू झालं, थांबेचना - “मला पुढची गोष्ट नको. त्याची आई हवी!”

    आतापर्यंत तीन – चार सिनेमे माऊला दाखवायचा प्रयत्न करून झालाय. “मादागास्कर” मध्ये सुरुवातीला सगळं काही ठीक चाललं होतं, पण अलेक्स त्याच्या मित्राला मारणार असं वाटल्यावर रडायला सुरुवात. “अप” मध्ये केव्हिनला पकडल्यावर तेच. आणि “मकडी” तर तिने बघितलाच नाही. हे असं रडणं सुरू झालं, की आपण हे दाखवायच्या फंदात का पडलो म्हणून मला पश्चात्ताप होतो. एरव्ही माऊ अंधाराला, अनोळाखी माणसांना, भूभूला कश्शाला घाबरत नाही. गोष्टीतही कुणीतरी दुष्ट मावशी वगैरे भेटतेच. पण सिनेमात कुणी दुष्टपणा केला किंवा मरून बिरून गेलं की संपलंच. आणि सगळं फक्त गोडगोड अशी गोष्ट कशी सापडणार आणि आवडणार? माऊला उगाच रडायला लावायचं नाहीये, आणि जगाची रीत तर तिला हळुहळू कळायला हवीय. कुठला सिनेमा दाखवावा बरं आता माऊला?

8 comments:

हेरंब said...

Incredibles, Croods, Toy Story, Bolt.

http://www.imdb.com/title/tt0317705/
http://www.imdb.com/title/tt0481499/
http://www.imdb.com/title/tt0114709/
http://www.imdb.com/title/tt0397892/

आम्हीही आदितेयला सुरुवातीला बरीच वर्ष मरण, मेला, मारलं, मृत्य या आणि अशा प्रकारच्या शब्दांपासून दूर ठेवायचो. त्याच्यासमोर उच्चारायचोही नाही. मग हळू हळू आपोआप सुरुवात केली थोडं थोडं सांगायला. तर त्यावेळी आम्ही त्याला हे तीन-चार चित्रपट दाखवायचो. (अजूनही होते आठवत नाही आता). आणि हे सगळे त्याला खूप आवडायचे. ट्राय करून बघ.

Gouri said...

हे सिनेमे दाखवून बघते आता.
तसं पणजीआज्जी मेली आणि देवाघरी गेली हे माहित आहे तिला. "तुम्ही कधी देवाघरी जाणार?" म्हणून कुणाकुणाला विचारून पण झालंय. गोष्टी ऐकतांना/ वाचतांना चालतात त्या घटना पण सिनेमामध्ये चालत नाहीयेत!

Anagha said...

मैत्रेयीने नेहेमीच लायन किंग बघणे टाळलेले आहे. कारण त्यात त्याचा बाबा मरतो.

Gouri said...

हो ना - आणि आपल्यामुळे बाबा मेला असं त्याला वाटाणारं अपराधीपण - म्हणून लायन किंग नाही दाखवला मी. फाइंडिंग नेमोमध्ये तसं त्याला आईची आठवण वगैरे पण येताना दाखवली नाहीये म्हणून तो सेफ असं समजत होते मी, पण तोही नकोय आम्हाला!

rajiv said...

मोगली - जंगल बुक दाखवा

Gouri said...

या आठवड्यात "Home" दखवायचा अजून एक प्रयत्न झाला, त्यालाही फारसं यश आलं नाही. त्यामुळे आता थोडे दिवस काहीच धाखवायला नको, मग पुन्हा प्रयत्न करू असं ठरवलंय! :)

अपर्णा said...

Gauri I don't know if PBS kids is available in India but they have age appropriate stuff. Sometimes options vary for boys and girl but go online and pick for her age group. Start with Wyath its Da best for preK kids irresepctive of gender. Good luck.

Gouri said...

अपर्णा, PBS kids नाही दिसत ग इथून ... फक्त US साठी आहे वाटतं! Wyath काय आहे? सापडलं नाही!