आपले बॉलिवूडवाले तारेतारका ‘स्ट्रिक्टली प्रायव्हेट’ मध्ये लग्न वगैरे उरकून घेतात ना, टपून बसलेल्या मिडियावाल्यांना गुंगारा देत, तसं आल्याचं झाड लपून छपून फुलत असावं अशी मला शंका होती. रोज सकाळी मी बघते, तेंव्हा झाड नेहेमीसारखंच दिसत होतं - पण एक दिवस मला छडा लागलाच. सकाळी तपकिरी आणि पिवळी अश्या रंगसंगतीची दोन नाजुक फुलं झाडाजवळ पडलेली सापडली. मग कालच्या दिवशी सारखं दोन दोन तासांनी झाडावर नजर ठेवून होते, आणि शेवटी चोरी पकडलीच :)
तर आल्याचं फूल हे असं दिसतं ... ‘हिरवाईचा उत्सव’ मधल्या फोटोतली आल्याची कळी होती ना, तिला आलेली ही फुलं. फूल दुपारी फुलतं, आणि लगेच रात्री गळूनही पडतं. काल संध्याकाळच्या वेड्या पावसामध्ये कॅमेर्यावर छत्री धरून हा फोटो काढलाय ...
फ्लॅशमुळे पिवळा रंग इथे फिकट दिसतोय - प्रत्यक्षात तो पिवळा धमक आहे. पुन्हा, पाऊस नसताना फूल आलं, तर अजून चांगला फोटो घेता येईल.
16 comments:
एकदच छान... चांगलीच हेरगिरी आहे... आवडली...
WOW गौरी!!! किती सुंदर आहेत फुलं!! आणि तुझी हेरगिरी आवडली! :)
आई गं... डिटेक्टिव्ह गौरी :)
कसलं मस्त आहे ते फुलं.... सुंदर!!!
तन्वी, आनंद, अनघा, सुट्टीचा सदुपयोग :)
फोटो छानच आलाय. फोटोत इतकं सुंदर दिसतंय फूल तर प्रत्यक्षात काय दिसलं असेल. आल्याला फूल पण येतं, हे माहित नव्हतं.
वेड्या पावसामधे ... हे हे.... तू वेडेपणा केल्यामुळे आम्हाला हे पहायला मिळालं. धन्यवाद.
कांचन, मलाही माहित नव्ह्तं आल्याला फुलं येतात ते. मी मागे आल्याच्या कळीचा फोटो टाकला होता, तेंव्हा शरयू यांची प्रतिक्रिया आली होती आल्याला फुलं येतात अशी. मग थोडा गुगलवर शोध घेतला - तर आल्याची फुलं म्हणून खूपच वेगवेगळ्या प्रकारचे फोटो सापडले. आपल्या साध्या आल्याला इतकी सुंदर फुलं येतात हे आताच समजलं.
काल एवढा पाऊस पडला संध्याकाळी, कि ही फुलं टिकणारच नाहीत असं वाटलं ... मग पावसात जाऊन फोटो काढले :)
आल्याला आलं फूल! :P
मस्त फोटो!
विद्याधर, :)
आल्याला पहिले कोंब आले तेंव्हा मला असं "आलं रे आलं" झालं होतं :D
आल्याचं फुल पहिल्यांदाच पाहिलं. मस्त आहे आणि फोटॊ पण छान आलाय .
महेंद्रकाका, मीही पहिल्यांदाच पाहिलं आल्याचं फूल. त्याचा वास मात्र बघायचा राहून गेला - हे आत्ता लक्षात आलंय :(.
‘आलं’का शेवटी? छान आहे. आता छान SLR कॅमेरा घे की फुलांचे गॉसिपवाले फोटो काढायला. फ्लॅशमुळे जाणारा गडद पिवळा रंगही दिसू दे आम्हांला.
बरं देऊ का कॅमेराची लिंक?
पंकज, आलं रे आलं!
एस एल आर घेणार, पण अजून थोड्या दिवसांनी - आणि तेंव्हा लिंक पुरणार नाही - मी डायरेक्ट एक्स्पर्ट ऍडव्हाईस म्हणून तुलाच कन्सल्ट करणार आहे :)
आल्याचे फुल हा विचारच कल्पनातीत आणि त्यातून प्रत्यक्ष त्याचे दर्शन..
गौरी तुझ्या हेरगिरीमुळे एका अज्ञात गोष्टीचे ज्ञान मिळाले. खूप सुंदर आहे फोटो .
राजीव, आपल्याला रोज भेटणार्या, वरकरणी सामान्य वाटाणार्या व्यक्तीविषयी अचानक काहीतरी नवीनच माहिती मिळावी आणि तिचं वेगळेपण समजावं, तसं वाटतंय या शोधामुळे :)
सुंदर आला आहे फोटो
धन्यवाद, आनंद!
Post a Comment