Monday, October 25, 2010

हावरट

पुस्तकांची खा खा सुटलीय. किती घेतली आणि वाचली तरी पोट भरल्यासारखं वाटत नाही.

एका दिवसात २ पुस्तक प्रदर्शनं.

    दुर्गा भागवतांचं ‘आठवले तसे’. (झालं वाचून. दुर्गाबाईंनी टीका केलेली माणसंही मोठ्या कर्तृत्त्वाची माणसं आहेत. त्यांच्याहून मोठं कर्तृत्त्व आणि स्पष्ट विचार असणार्‍या दुर्गाबाईंना टीका करण्याचा हक्क पोहोचतो. आपण तो भाग सोडू्न द्यायचा.)

    साधनाताई आमटेंच्या आठवणी - ‘समिधा’. (नेहेमी मोठ्या झालेल्या माणसांच्या बायकोच्या आठवणी म्हणजे अन्याय, फरफट, दिव्याखालचा अंधार यांचंच चित्रण जास्त असतं. हे पुस्तक तसं नाही. हा दोघांनी मिळून केलेला प्रवास आहे. त्यामुळे फार आवडलं पुस्तक.)

    स्वगत - जयप्रकाशांची तुरुंगातली दैनंदिनी, पुलंनी मराठीत आणलेली. (उत्सुकता म्हणून घेतलीय, पण सुरुवातीचे काही दिवस वाचून तरी फार तात्कालिक संदर्भ वाटताहेत - आणिबाणीच्या परिस्थितीचे. बघू पुढे काही इंटरेस्टिंग सापडतंय का ते.)


    रविंद्रनाथांची ‘गोरा’ - कित्येक दिवसांपासून वाचायची आहे. गॉर्कीच्या ‘मदर’सारखीच रटाळ आहे असं ऐकून आहे, तरीही. (एक आशावादी, महत्त्वाकांक्षी प्रकल्प.घरात पुस्तकं ठेवायला जागा नाही, तरी जे वाचण्याची खात्री नाही असं पुस्तक मी कशाला विकत आणलंय मलाही माहित नाही. सुदैवाने नवर्‍याची पुस्तकं वेगाळी असतात, त्यामुळे अश्या विकत घेऊन न वाचलेल्या पुस्तकांची त्याला कल्पना नाही. नाही तर काही खैर नव्हती.)

    पूर्निया - डॉ.अनिल अवचटांचं पहिलं पुस्तक.

    ना ग गोर्‍यांचे सीतेचे पोहे.

    राजा शिरगुप्पे यांची शोधयात्रा - ग्रामीण महाराष्ट्रातल्या दुर्गम भागांची.

    विनय हर्डीकरांचं ‘जनांचा प्रवाहो चालिला’.

    महाराष्ट्र देशा - दोन प्रती (हार्ड बाऊंड मिळतंच नाहीये आता), ‘हिंदू’(आणि त्याच्यावर फुकट मिळाल्यामुळे ‘कोसला’), टाईम्स सूडोकू आणि जिब्रानचं प्रॉफेट ही पुस्तकं देण्यासाठी घेतली आहेत, त्यामुळे ती मोजायची नाहीत.

    ‘अक्षरधारा’वाले कार्ड स्वीकारत नाहीत, जवळचे पैसे संपले. आणि निवडलेली पुस्तकंही हातात मावेनाशी झाली. नाही तर?

    अजून दिवाळी अंक नाही दिसले कुठे.

    पुणे बुक फेअरला महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाचा स्टॉल आहे. तिथे ‘किशोर’ मधल्या निवडक कथा, कविता, इ. ची संकलित पुस्तकं होती. आमच्याकडे माझे भाऊ लहान असतानापासूनच्या काळातले किशोरचे अंक जपून ठेवलेले होते. या जुन्या अंकांमध्ये काही अतिशय सुंदर लेखमाला होत्या - ‘चीनचे प्राचीन शोध’ - यात कागद, रेशीम, घड्याळ, लोहचुंबक, चिनी माती अश्या शोधांविषयी अतिशय रंजक माहिती होती. ‘ज्ञानवृक्षाच्या पारंब्या’ मध्ये पारा आणि गंधकापासून औषधनिर्मिती करणारा नागार्जुन, शुल्बसूत्रकार कात्यायन, पिंगल अश्या प्राचीन भारतीय ज्ञानोपासकांविषयी फार सुंदर माहिती होती. पाठयपुस्तक निर्मिती मंडळाला या मालिका पुस्तकरूपाने प्रसिद्ध नाही करता येणर का?

24 comments:

Raj said...

>पुस्तकांची खा खा सुटलीय. किती घेतली आणि वाचली तरी >पोट भरल्यासारखं वाटत नाही.

हॅहॅहॅ. जॉइन द क्लब. मला पुस्तकांच्या दुकानात गेल्यावर बायकांना साड्या/ड्रेस/चपला पाहून जे होते तसे होते :)

THEPROPHET said...

तुम्हाला पुस्तकांची केवळ भूक नाही, तर वाचकीय खाई-खाई सुटलीय! (पुलंच्या वाक्यावरून साभार!)
माझ्याही घरी काही न वाचलेली पुस्तके पडून आहेत, ह्याची आठवण झाली! :)

Gouri said...

राज, खरंच परवा तशीच परिस्थिती होती. पैसे संपले म्हणून खरेदी संपली.

Gouri said...

विद्याधर, बाप रे ... रोग वाढत जाऊन सखाराम गटणे नाही ना होणार माझा ? :)

Anagha said...

मस्त! किशोर मासिकांनी माझं आणि माझ्या बहिणंीचं बालपण एकदम समृद्ध केलं होतं. मी ते संकलित अंक घेतलेत....पण मजा नाही आली! दुर्गा आजींचं 'आठवले तसे'चं वेष्टण मी केलं होतं!! हेहे!! माझं नाव सापडेल बघ त्यावर! मज्जा! :)

रोहन... said...

गौरी.. तुमच्या वाचनाच्या साधनेत मी भंग तर नाही ना केला.. इति सखाराम गटणे ... :D

Gouri said...

अनघा, मी पण संकलित अंक चाळले, पण माझ्या ओळखीच्या किशोरमधल्या गोष्टी त्यात फारश्या दिसल्या नाहीत. मी लहानपणी त्या महिन्याच्या ताज्या अंकांपेक्षा जुन्या, पत्रावळी झालेल्या अंकांची पारायणंच जास्त केलीत! :)
‘आठवले तसे’ वर फक्त मुखपृष्ठ छपाई, मुद्रण आणि प्रकाशनाची माहिती आहे - तुझं नाव नाही दिलेलं त्यांनी. छान आहे मुखपृष्ठ.

Gouri said...

रोहन, :D :D
पुन्हा वाचायला पाहिजे एकदा सखाराम गटणे.

Anagha said...

अगं, त्यावर एखाद्या वहीचं पान असावं असं आहे का? म्हणजे समास आणि ओळी? आणि हाताने लिहिलेलं 'आठवले तसे'? कदाचित नवीन आवृत्तीचं वेष्टण प्रकाशकाने बदलेलं असू शकेल...नाही का?

Gouri said...

समास आणि ओळी आखलेलं वहीचं पान, तळाशी हाताने लिहिलेलं पुस्तकाचं आणि लेखिकेचं नाव असं आहे. आवृत्ती दुसरी (फेब्रुवारी २००३). हेच बनवलं होतंस ना तू?

Anagha said...

हो गं! नाव नाहीये माझं त्यावर?? :(

Gouri said...

तुझं नाव नाही सापडलं त्यावर अनघा :(

हेरंब said...

काय ग गौरी.. भलामोठा कॉम्प्लेक्स दिलायस तू.. किती किती काय काय वाचायचं राहिलंय अजून !!

बाकी, 'समिधा' वाचल्यावर माझीही अगदी हीच प्रतिक्रिया होती..

Gouri said...

हेरंब, अरे कितीही वाचलं तरी न वाचलेल्या गोष्टींची यादी त्याहून मोठीच राहणार ना!

Anagha said...

गौरी, तपासलं मी! माझ्याकडे आहे ती आहे 'आठवले तसे' ची पहिली आवृत्ती. ऑक्टोबर १९९१. त्यावर आहे माझं नाव! :) प्रकाशक नाना जोशी. किंमत १५० रुपये. म्हणजे दुसऱ्या आवृत्तीवर त्यांनी नाव नाही छापलं माझं! :(

Gouri said...

अनघा, दुसर्‍या आवृत्तीचे मुद्रक आणि प्रकाशक मे. वरदा बुक्स (ह. अ. भावे), सेनापती बापट रोड, पुणे हे आहेत, कॉपीराईटही त्यांचाच. किंमत २०० रुपये.

Meghana Bhuskute said...

नमस्कार, तुमचा संपर्क पत्ता मिळेल का?

Gouri said...

मेघना, मेल पाठवली आहे मी.

अपर्णा said...

हम्म्म्म सुट्टी सुरु झाली की काय तुझी?? की ही पूर्वतयारी??? किती दिवस निवांतपणे वाचायलाच मिळत नाही हे पुन्हा एकदा जाणवलं...

Gouri said...

अपर्णा, अग सुट्टीला अजून अवकाश आहे. ही पुस्तकं सुट्टीपूर्वीच फस्त करणार :) ... निवांत, सलग वेळ नाही, पण दोन मिनिटं मिळाली की पुस्तकात डोकं घालायचं असं चाललंय. घरात प्रत्येक खोलीत दोन तरी पेरून ठेवली आहेत - त्या खोलीत असताना वेळ मिळाला तर पुस्तक आणण्यात तो वाया नको ना जायला :D

अवधूत डोंगरे said...

दुर्गाबाईंचं 'आस्वाद आणि आक्षेप' नावाचं एक पुस्तक आहे 'डिंपल पब्लिकेशन्स'ने प्रकाशित केलेलं, त्यात त्यांनी काही पुस्तकांबद्दल लिहिलंय.
त्यातले दोन लेख इकडे आहेत, बघा तुम्हाला आवडतात का, त्यांच्या लिंक्स अशा आहेत-
१) भाऊ पाध्यांच्या 'बॅरिस्टर अनिरुद्ध धोपेश्वरकर'वर त्यांनी लिहिलेलं- http://bhaupadhye.blogspot.com/2010/06/blog-post_26.html

२) भाऊंच्याच 'वासूनाक्या'वर त्यांनी लिहिलेलं- http://bhaupadhye.blogspot.com/2010/06/blog-post_20.html

तुम्ही दुर्गाबाईंचा उल्लेख केलायत म्हणून सांगवंसं वाटलं. बाकी, बाई भलत्याच ग्रेट होत्या.

Gouri said...

अवधूत, लिंक्सबद्दल आभार. ‘आस्वाद आणि आक्षेप’ वाचलेलं नाही. वाचून बघते.
दुर्गाबाईंचं लेखन थोडंच वाचलंय, पण जे काही त्यांचं / त्यांच्याविषयी वाचलंय, त्यावरून वाटतं, अशी कुणी व्यक्ती आपल्याकडे होऊन गेली ही केवढी अभिमानाची गोष्ट आहे!

वैनिल said...

"आमच्याकडे माझे भाऊ लहान असतानापासूनच्या काळातले किशोरचे अंक जपून ठेवलेले होते. या जुन्या अंकांमध्ये काही अतिशय सुंदर लेखमाला होत्या - ‘चीनचे प्राचीन शोध’ - यात कागद, रेशीम, घड्याळ, लोहचुंबक, चिनी माती अश्या शोधांविषयी अतिशय रंजक माहिती होती. ‘ज्ञानवृक्षाच्या पारंब्या’ मध्ये पारा आणि गंधकापासून औषधनिर्मिती करणारा नागार्जुन, शुल्बसूत्रकार कात्यायन, पिंगल अश्या प्राचीन भारतीय ज्ञानोपासकांविषयी फार सुंदर माहिती होती. पाठयपुस्तक निर्मिती मंडळाला या मालिका पुस्तकरूपाने प्रसिद्ध नाही करता येणर का?"

@Gouri, किशोरचे जुने अंक आता PDF स्वरूपात उपलब्ध आहेत, तेही चक्क चकटफू : http://kishor.ebalbharati.in/archive/ :-)

Gouri said...

वैनिल, कालच या किशोर मासिकाच्या पीडीएफ विषयी ऐकलं. लिंक इथे टाकल्याबद्दल धन्यवाद!