Tuesday, February 22, 2011

कोणार्क

    सुट्टीमध्ये थोडा ओरिसाचा फेरफटका झाला. ओरिसामध्ये बघण्यासारखं म्हणजे पुरी आणि कोणार्क. दोन्ही भुवनेश्वरहून जाण्यासारख्या जागा आहेत. आपलं वाहन असेल, तर भुवनेश्वरहून पुरी आणि कोणार्क दोन्ही एका दिवसात बघता येतं.  भुवनेश्वरमध्ये असलेलं लिंगराज मंदिरही पुरीच्या जगन्नाथ  मंदिराच्याच शैलीतलं. खेरीज इतिहासाची आवड असेल, तर भुवनेश्वरजवळ धौलीही बघायला आवडेल. सम्राट अशोकाचा शिलालेख, तिथे नव्याने बांधलेला शांतीस्तूप, कलिंगचं युद्ध जिथे झालं  ती राणभूमी या गोष्टी धौलीला आहेत. भुवनेश्वरजवळ खंडगिरी - उदयगिरी ही प्रसिद्ध जैन लेणीही आहेत. हे सगळं एका दिवसात भुवनेश्वरहून बघता येतं. हे या भटकंतीमधले फोटो. (यातले बरेचसे फोटो आळश्यांच्या राजाने काढलेले आहेत.)

    कोणार्कला जाताना वाटेत - ओरिसाच्या हस्तकला विकणारं रंगीबेरंगी दुकान. गावाचं नाव विसरले :(


    "ही जागा पुरातत्वखात्याच्या मालकीची आहे .... फोटो काढण्यास सक्त मनाई" वगैरे नेहेमी दिसणार्‍या प्रेमळ पाट्यांऐवजी पुरातत्त्व खात्याने इथे छान मंदिराची माहिती दिली आहे. अशी माहिती महाराष्ट्रातल्या गडकिल्ल्यांवरही लिहिण्याची बुद्धी आपल्या पुरातत्त्व खात्याला होवो!


    मंदिराचा संपूर्ण परिसर. समुद्रकिनार्‍यावर, मऊ दगडात बांधकाम केल्यामुळे खूप झीज झालेली आहे. डागडुजी / दुरुस्ती चालू आहे. उत्तरायण - दक्षिणायनाप्रमाणे सूर्याचे किरण गर्भगृहात कसे प्रवेश करतील याचा अभ्यास करून मंदिराची रचना केलेली होती.    हे छोटे खांब एकविसाव्या शतकात मंदिरासमोर फोटो काढता यावा म्हणूनच केले होते गंग राजानी :)

    मंदिराचा side view. या मंदिराच्या बांधकामामध्ये चुन्याचा वापर नाही. लोखंडी सळया वापरून दगड एकमेकांवर बसवलेले आहेत! कळसामध्ये एक शक्तीशाली लोहचुंबक बसवलेलं होतं. सोळाव्या शतकात कळसामधलं लोहचुंबक काढून टाकल्यानंतर गर्भगृहाचा कळस पडला, हळुहळू गर्भगृहाचा फक्त चौथरा उरला. (आमच्या गाईडच्या सांगण्याप्रमाणे या लोहचुंबकामुळे वास्को द गामाचा कंपास नीट दिशा दाखवत नव्हता, म्हणून त्याने ते लोहचुंबक काढून टाकलं :D) आज जे काय उभं आहे, ते लॉर्ड कर्झनच्या (बंगालची फाळणी करणारा हाच लॉर्ड कर्झन) कृपेने. चौथर्‍यावरचा डावीकडे मोकळा दिसणारा भाग म्हणजे मूळ गर्भगृहाची जागा.


    सूर्यमंदिराचं प्रसिद्ध चाक ... अशी एकूण २४ चाकं आहेत - प्रत्येकावरचं कोरीव काम वेगवेगळं. कुठे दिवसाचे आठ प्रहर, तर कुठे ऋतू.


    कोणार्कहून पुरीला जाणार्‍या रस्त्यावरचा हा निवांत समुद्र! अंधारात पुरीचं मंदिर बघण्यापेक्षा इथेच थोडा वेळ निवांत बसावं म्हटलं. जगन्नाथ इथेच भेटला. :)


 

4 comments:

आळश्यांचा राजा said...

त्या गावाचं नाव पिपली.

Gouri said...

आ.रा., instant response! तू काय मे ‘पब्लिश’ चं बटण दाबता क्षणी प्रतिक्रिया लिहायला तयार होतास का? :)

हेरंब said...

मस्त फोटू..

>> जगन्नाथ इथेच भेटला. :)

क्या ब्बात !

Gouri said...

हेरंब, आभार्स. बाकी जगन्नाथाला सुद्धा मंदिरातल्या गर्दीपेक्षा मस्त समुद्रावर मोकळा श्वास घेताना बरं वाटत असेल, नाही का? :)