Wednesday, February 16, 2011

तपोभूमी आणि योगायोग

    सुट्टीची सुरुवात नवर्‍याबरोबर वैष्णोदेवी आणि रणथंबोरला जाऊन करायची होती. चार महिने आधीपासून सगळा प्लॅन तयार होता, सगळी कन्फर्म बुकिंग हातात होती. इतक्या सुखासुखी ठरल्यासारखा प्रवास झाला तर त्यात काय मजा ... तर ऐन वेळी नवर्‍याला ऑनसाईट जावं लागलं, आणि ही सगळी बुकिंग कॅन्सल करणं नशीबात आलं. त्यानंतर जाणवलं, आपल्या सुट्टीच्या पहिल्या दहा दिवसांच्या प्लॅनचीच वाट लागली आहे. एवढ्या महिन्यांच्या प्लॅनिंगनंतर घेतलेल्या सुट्टीचे इतके दिवस वाया घालवायचे? तातडीने ‘प्लॅन बी’ बनवायला हवा होता. सुट्टीचा एक उद्देश घरातली आणि मनातली अडगळ काढून टाकणं हा होता... त्यामुळे स्वच्छ कोरी पाटी घेऊन मग पुढे भटकता यावं, म्हणून विपश्यना शिबिराला जाणार होते. आता शिबिराच्या आधी करूनही ज्याचा उपयोग होईल असं काहीतरी हवं होतं. त्यामुळे सुट्टीची सुरुवात पॉंडिचेरीला अरविंदाश्रमापासून करायचं ठरवलं. यापूर्वी शाळेत असताना पुण्यातल्या एका संस्थेच्या गटाचा भाग म्हणून अरविंदाश्रमात गेले होते, आणि आता दुसर्‍यांदा भेट देऊन मी त्या पहिल्या भेटीची जादू तर गमावून बसणार नाही ना अशी शंका मनात होती, तरीही.

   
    कुठल्याही तपोभूमीवर तुम्ही गेलात, तर मन फार लवकर एकाग्र होतं, सहज ध्यान लागतं. तिथे आधी केलेल्या साधनेची व्हायब्रेशन्स असतात असं म्हणतात. अरविंद - माताजींच्या तपोभूमीमध्ये ते पुण्यापेक्षा लवकर भेटतील म्हणून पॉंडिचेरीला जायचं. अरविंदांची समाधी आणि समुद्र एवढ्या दोनच गोष्टींसाठी. जमलंच तर शेजारच्या ‘ऑरोव्हिले’मधलं ‘मातृमंदिर’ बघायचं. एवढंच ठरवून निघाले.

    पॉंडिचेरीला आश्रमात जाणं हा ऐनवेळी ठरलेला प्लॅन - त्यामुळे रेल्वेचं रिझर्वेशन मिळालं नव्हतं. ‘तात्काल’ मध्ये मिळवण्याचे प्रयत्न बुकिंगच्या दिवशी वीज, नेट, रेल्वेची बुकिंग साईट यांनी संगनमताने हाणून पाडले, आणि नाईलाजाने दोन दिवसांनंतरचं फ्लाईटचं बुकिंग करणं भाग पडलं. सुट्टीतले सगळे प्रवास कमीत कमी खर्चात करण्याचा माझा बेत पहिल्याच प्रवासात धुळीला मिळाला.

    निघताना विमान टेक ऑफ घेणार एवढ्यात नवर्‍याचा फोन - "शक्य असेल तर प्रवास कॅन्सल कर - चेन्नई, पॉंडिचेरी आणि जवळपासच्या किनारपट्टीवर गेले दोन दिवस प्रचंड पाऊस पडतोय, इव्हॅक्युएशन चालू आहे. उगाच जाऊन चेन्नईला अडकशील." गेल्या दोन दिवसात बातम्या वाचणे, ऐकणे, बघणे याच्या फंदात मी पडले नव्हते. आता चेन्नईला गेल्यावर जे होईल ते होईल म्हणून शांत बसणं एवढाच पर्याय होता. चेन्नईला विमान पोहोचलं तेंव्हा पावसाचं नमोनिशाण नव्हतं. तिथून पुढचा प्रवास सुरळीत झाला, आणि एकदाची पॉंडीला पोहोचले. आश्रमाच्या गेस्ट हाऊसचा प्रवेश बघून अपेक्षाभंग झाला... मागच्या भेटीत बघितलेल्या ‘फ्रेंच क्वार्टर’मधल्या सुंदर प्रशस्त रस्त्यांवरच्या गेस्ट हाऊसच्या इमारती कुठे, आणि धड प्रकाश नाही, समोरच्या कळकट शेवाळलेल्या भिंतीवरून पाणी वाहतं आहे अश्या जुनाट रस्त्यावरचं हे गेस्ट हाऊस कुठे असं वाटलं. खोलीत सामान टाकायला गेले, तर फक्त एका झिरो पॉवरच्या बापुडवाण्या बल्बचा प्रकाश. म्हणजे पाऊस पडत असला तर खोलीत वाचत बसणंही शक्य नाही. रात्री आठ वाजता तिथे पोहोचूनही ‘रात्रीचं जेवण ऑर्डर करण्याची वेळ संपली, आता जेवण मिळणार नाही’ हे ऐकून तर झक मारली आणि पुन्हा इथे येण्याच्या फंदात पडले असं वाटलं. माझा चेहेरा बघून बहुधा काऊंटरवरच्या माणसाला दया आली असावी. ‘जेवण मिळालं नाही तरी स्नॅक्स मिळतील’ त्याने पुस्ती जोडली. गेस्ट हाऊसच्या कँटीनमध्ये जेवणाच्या दुप्पट ‘स्नॅक्स’ खाऊन रूममध्ये पोहोचल्यावर खोलीत मोठ्या दिव्याचं चालणारं बटन सापडलं आणि मला ब्रह्मानंद झाला.

    दुसर्‍या दिवशी सकाळी नाश्ता करताना काही मराठी मंडळी भेटली. त्यांच्याकडून समजलं,की ते पोहोचले तेंव्हापासून मी पोहोचले त्या दिवशी संध्याकाळपर्यंत धुवांधार पाऊस पडत होता ... काल संध्याकाळी पहिल्यांदा सूर्यदर्शन झालं. म्हणजे मी उगाचच पावसात अडकू नये म्हणून त्या दिवशी रेल्वेने मला तिकिट न मिळण्याची व्यवस्था केली होती तर! ‘तत्काल’ न मिळाल्यावर रेल्वेला दिलेले शिव्याशाप मी परत घेतलेत.:)

    सकाळी जरा स्थिरस्थावर झाल्यावर पॉंडीचा नकाशा घेऊन बाहेर पडाले, आणि भर दुपारी घाम पुसत ब्युरो सेंट्रलमध्ये - आश्रमाच्या माहिती केंद्रामध्ये जाऊन थडकले. ‘डायनिंग हॉलची कूपन संपली, दुसरी जेवणाची व्यावस्था तुमची तुम्हाला करावी लागेल, ऑरोव्हिलेला आज जाता येणार नाही’ असा सगळा नन्नाचा पाढा ऐकून वैतागून बाहेर पडले. आधी पोटोबाची सोय केली, आणि मग उगाचच पुन्हा त्याच माहितीकेंद्रात जाऊन काही माहिती मिळते का ते बघावं म्हणून परत आले. आता एकदम ट्रान्स्फर सीन होता. मनापासून, छान माहिती देणारा भेटला. मातृमंदिराला कसं जायचं ते त्याने सांगितलं, बाकीची माहिती दिली. डायनिंगची कूपन मिळाली नाहीत म्हटल्यावर जेवायला मिळालं ना याची आवर्जून चौकशी केली. सहज त्याला विचारलं, "विमलताईंना मी मागे भेटले होते ... त्यांची भेट होऊ शकेल का?" विमलताई या पुण्यातून अरविंदाश्रमात आलेल्या जुन्या साधिका. "विमलताईंना भेटायला तुम्हाला उशीर झालाय ... त्या तीन महिन्यांपूर्वी गेल्या." त्याच्याकाडून धक्कादायक माहिती मिळाली. "पण मराठी प्रकाशन विभागाचं काम आता जे बघतात, त्या प्रभाकरभाईंना तुम्ही भेटू शकता." त्याने प्रभाकरभाई सापडण्याची जागा आणि वेळ सांगितली. (अजून एक योगायोग - दुसर्‍या दिवशी डायनिंग हॉलजवळ त्याची भेट झाली, आणि त्यानेच प्रभाकरभाईंची गाठ घालून दिली.)

    पॉंडीजवळच ‘ऑरोव्हिले’ नावाचं एक ग्लोबल व्हिलेज उभारलं जातंय. मागच्या भेटीमध्ये इथल्या मातृमंदिराचं बांधकाम चालू असताना बघितलं होतं, आणि तेंव्हा तिथे काम करणार्‍या एका साधकानी "हे काम पूर्ण व्हायला अजून पंचवीस वर्षं लागतील." असं सहज सांगितलं होतं. एकवीस वर्षांनी तिथे परत जाताना हा संवाद आठवला. मातृमंदिराचं काम नियोजनाप्रमाणे चाललंय - आता इमारतीचं काम पूर्ण झालंय, आणि आजुबाजूचं लँडस्केपिंग चालू आहे! पाऊस असला, तर मातृमंदिराला भेट देता येत नाही. अगाऊ बुकिंग असल्याशिवाय आत प्रवेश मिळत नाही. ध्यान करण्यासाठी ही अतिशय सुंदर जागा आहे, त्यामुळे नुसतं ‘बाहेरून एक सुंदर वास्तू बघितली’ यावर समाधान मानण्यापेक्षा अगाऊ बुकिंग करणं (आणि त्या दिवशी पाऊस नसावा अशी प्रार्थना करणं) वर्थ आहे.

    या पूर्ण ट्रीपमध्ये काढलेला हा एकमेव इंटरेस्टिंग फोटो. बाकी आश्रमाच्या वास्तूंमध्ये फोटो काढायला मनाई आहे, आणि समुद्रावर फोटो काढावासाच वाटत नव्हता!

    प्रभाकरभाईंना निवांत वेळ घेऊन भेटले. गेली ६० वर्षं ते आश्रमात राहताहेत ... १९५० साली योगी अरविंदांच्या निधनानंतर काही महिन्यांनी ते इथे आले, आणि तेंव्हापासून इथेच आहेत. आज वयाच्या ८७व्या वर्षीसुद्धा ते काम करतात - रोज सकाळी डायनिंग हॉलमध्ये दोन तास, नंतर आश्रमाच्या मार्बलींग उद्योगामध्ये, आणि दुपारनंतर मराठी प्रकाशन विभागात! अरविंदांच्या, मदरच्या सांगण्यानुसार रोजच्या आयुष्यातलं प्रत्येक काम हे साधना म्हणून करण्याचं हे एक उदाहरण. एक - दोन नाही, गेली साठ वर्षं त्यांची ही साधना चाललीय.आध्यात्मिक बळ असल्याशिवाय असं काम कुणी करू शकणार नाही असं वाटतं. ब्युरो सेंट्रलला दुसर्‍यांदा जायची मला बुद्धी झाली नसती तर त्यांना भेटण्याची ही संधीही हुकली असती!

16 comments:

अनघा said...

पुढल्यावेळी हे असं जेव्हा डोक्यात येईल तेव्हा जरा मला कळवशील कां? मी पण येईन तुझ्याबरोबर! तुला चालणार असेल तर अर्थात... :)
असं काही लिहितेस ते खूप चांगलं आहे...त्यामुळे माहिती होते...फक्त असं वाटतं कि कधी करणार हे मी सगळं!?
:)

Gouri said...

अनघा, नक्की कळवीन ... पण पुन्हा डोक्यात कधी येईल आणि कधी मुहुर्त लागेल ते मात्र माहित नाही :)
अरविंदाश्रम ही अनुभवण्याची गोष्ट - सांगण्या-लिहिण्याची नाही. त्यामुळे या भेटीविषयी लिहावं का नाही असं वाटत होतं. ते वाचून कुणाला तिथे जाऊन यावंसं वाटलं असेल तर पोस्ट सार्थकी लागली माझी!

हेरंब said...

गौरी !!! मी तुझ्या ब्लॉगवर बहिष्कार टाकतोय. तू कुठल्या कुठल्या ग्रेटेस्ट ठिकाणांना जाऊन भेटी देतेस, पोस्ट्स टाकतेस आणि त्याच्या एक सहस्त्रांशही आयुष्याचा उपभोग घेता येत नाही म्हणून आम्ही इथे हळहळतो !! :(

जोक्स अपार्ट,
मस्त अनुभव !! सुंदर मांडलायस !!

अपर्णा said...

हेरंब +100000000000000000000

aativas said...

पोंडीचेरी ही माझी एक आवडती जागा! तुमची पोस्ट वाचून तिथ पुन्हा गेल्यासारख वाटल!

Gouri said...

हेरंब ... हा हा ... निषेधासाठी नवी कॅटॅगरी ... नॉन खादाडी पोस्टचा निषेध :D!
एकदा गेलं म्हणजे परत परत जावंसं वाटावं अशी जागा आहे ही.

Gouri said...

अपर्णा, :)

Gouri said...

सविता, धन्यवाद!

Jayanti said...

khup khup chhan watala he sagala wachun..
Pondy he maza atyant awadata thikan ahe..
speacillay tithala ashram n rocky beach tar awesome.. :-) :-)
MI tikade ata parynat 3 wela jaun aley.. ani he wachalyawar parat jaun alya sarakha watala.. :) :)
khup khup aabhar.. :) :)

Gouri said...

जयंती, पॉंडेचरीला एकदा गेलं, म्हणजे पुन्हा पुन्हा जायची ओढ वाटते. समुद्रावर आणि आश्रमामध्ये, दोन्ही ठिकाणी भरपूर वेळ मिळाला मला ... तेवढ्यासाठीच गेले होते खरं तर!

yogik said...

pondy...!!coffe...dose..portugese colony...market..ashram..golconde....samudra...auroville tar architects saathi pandharich ahe!!
auroville- vernacular ani contemporary che uttam prayogik mishran....pondy chya aaathwani jagawalyabaddal dhanyawad!!

Gouri said...

yogik, ब्लॉगवर स्वागत, आणि प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद! आर्किटेक्ट्च्या नजरेतून बघायला पॉंडी म्हणजे मेजवानी असणार!

yogik said...

sorry...french colony!!
asach kahi anubhav ahe majha auroville cha....khup bhatkaloy tikde.pondy chya ajubajula marathyani bandhleli kahi mandire hi ahet...
tumcha 'search' wishyicha lekh hi far awdala...pan himmat hot nahiye tikde jayla...nice read!!

Gouri said...

योगिक, मराठ्यांची मंदिरं तिथे जवळपास आहेत हे माहित नव्हतं. पुन्हा कधी जायचा योग आला तर बघितली पाहिजेत. तसंही महाबलीपुरम् आणि कल्पक्कम बघायचं बाकी आहे अजून :)

‘सर्च’ नुसतं बघायलाही जाता येतं पूर्वकल्पना देऊन.

भानस said...

गौरे, अगं आयत्यावेळी ठरवूनही किती छान झाला तुझा अनुभव. खरेच हे असे वाचले की लगेच मन उसळ्या मारायला लागते. आपण कधी पाहणार हे. हेरंबशी सहमत असले तरीही निदान तुझ्यामुळे हे वाचायला मिळाले हेही नसे थोडके.

खूपच भावला अनुभव. :)

Gouri said...

भाग्यश्रीताई, अगं कुठे गायब आहेस सद्ध्या? खूप दिवसांनी तुझी प्रतिक्रिया बघितली, खूप छान वाटलं.
आपण कितीही बघितलं तरी न बघितलेलं केवढंतरी जास्त राहतं ग. या वेळी खास सुट्टी काढून फिरले, तरी किती गोष्टी आत्ता बघता आल्याच नाहीत!