Monday, March 26, 2012

Open


आंद्रे आगासी. माझ्या मनातली त्याची प्रतिमा म्हणजे खेळ कमी आणि दिखावा जास्त. मुद्दाम पुस्तक मिळवून त्याच्याविषयी वाचावं असं काही मला आपणहून वाटलं नसतं. खरं सांगायचं तर माझ्या लाडक्या स्टेफीच्या नव‍र्‍याचं पुस्तक म्हणून हे पहिल्यांदा वाचायला घेतलं... म्हणजे पुस्तक सुंदर आहे म्हणून अनघाने आधी सांगितलं होतं,पण अंतस्थ हेतू स्टेफीला या पंकमध्ये नेमकं काय बरं दिसलं असावं हे तपासण्याचा होता. :D

पण पुस्तक वाचत गेले तसतसा त्यात दिसणारा आंद्रे खूप ओळखीचा वाटायला लागला. टेनिस आवडतही नाही, आणि सोडवतही नाही अश्या चक्रव्यूहात धडपडणारा. स्वतःच्या शोधातला.

व्यावसायिक टेनिसमधलं करियर म्हणजे पंधराव्या-सोळाव्या वर्षी सुरू होणार आणि तीस - पस्तिसाव्या वर्षी तुम्हाला ‘माजी’मध्ये जमा करणार. जे काही करून दाखवायचंय ते या पंधरा-वीस वर्षांच्या काळात. स्पर्धा, प्रसिद्धी, पैसा, फिरती आणि टेनिससारखा शारीरिक आणि मानसिक ताकदीचा कस लावणारा खेळ. इथे जागेवर टिकून राहण्यासाठीही धावत रहावं लागतं. हा सांघिक खेळ नाही. त्यामुळे विजयही तुमचाच आणि अपयशही फक्त तुमचांच. त्यात वाटेकरी नाहीत. तुमची एक एक चूक मॅग्निफाय करून जगाच्या कानाकोपर्‍यात स्लो मोशनमध्ये हजारो वेळा चघळली जाते. तुमचं काम म्हणजे हारेपर्यंत खेळत रहायचं, आणि हारल्यावर पुन्हा जिंकण्यासाठी!

अश्या खेळामध्ये एक मनस्वी खेळाडू उतरतो - किंवा ढकलला जातो. त्याला या खेळाविषयी कधीच प्रेम नव्हतं. त्याच्या लहानपणी त्याच्या वडलांनीच ठरवून टाकलंय की आन्द्रे टेनिस खेळणार, आणि तशी तयारीही चालू झालीय. टेनिस सोडून आन्द्रेला दुसरं काही येत नाही, आणि टेनिसचा तर मनापासून तिटकारा आहे. इतक्या वषांच्या सरावातून तो तांत्रिक दृष्ट्या खूपच सरस आहे. पण व्यावसायिक स्तरावर खेळताना खेळाचं तंत्र हा जिंकण्यातला फार छोटा भाग असतो. इथे बाजी मारून जातात त्या लढण्याची इच्छा, एकाग्रता, चिकाटी,consistancy अश्या गोष्टी. आणि मनातून वाटल्याशिवाय यांत्रिकपणे खेळणं आन्द्रेला येत नाही. त्यामुळे कधी उत्तम खेळी,कधी पहिल्याच फेरीत नामुष्कीचा पराभव, कधी लोकांच्या गळ्यातला ताईत, कधी सगळीकडून टीकेचा मारा असा आन्द्रेचा हा सगळा प्रवास आहे. निराशेच्या गर्तेत म्हणजे अगदी उत्तेजक द्रव्य घेण्यापर्यंत जाऊन तो परत येतो. परत उभा राहतो, कारकीर्दीच्या अत्युच्च शिखरावर पोहोचतो.

चुकणारा, सावरणारा, पुन्हा चुकणारा एक हाडामांसाचा माणूस या पुस्तकात भेटतो, म्हणून मला ‘ओपन’ आवडलं.

बाकी त्याचं विश्व आणि माझं विश्व यांची काहीच तुलना नसेल, पण आपल्याला आयुष्यात काय करायचंय याच्या कन्फ्युजनमध्ये आणि आपण कुवतीएवढं करून दाखवत नाही या टोचणीमध्ये मी त्याच्या अगदी जवळपासच आहे. :D :D

Open - An Autobiography
Andre Agassi
2009, Harper Collins Publishers

20 comments:

Abhishek said...

उत्सुकता ताणावलीत...

Gouri said...

अभिषेक, जरून वाचून पहा.

SUSHMEY said...

उत्सुकता ताणावलीत..khrach prachand utsukata wadhawalit.... baghu kevha wachayala milate te

Gouri said...

प्रवीण, कालच वाचून संपवलंय मी पुस्तक ... त्यामुळे सद्ध्या जो भेटेल त्याला कौतुक सांगते आहे ‘ओपन’चं :)

अपर्णा said...

गौरी, सात आठ टपल्या मारून घे अनघाकडून माझ्या वतीने....(श्या काय वाक्य झालंय) अगं कालच हेरंबला मी हे रेकमेंड करत होते कारण कशावरून तरी टेनिस या विषयावर बोलत होते..मागच्या वर्षीच्या उन्हाळ्यात लायब्ररीतून आणून वाचलं...कसलं भन्नाट आहे नं आणि मजा म्हणजे माझा नवरा बर्‍यापैकी टेनिस खेळतो आणि आम्ही दोघंही ग्रॅंडस्लॅम्स आवडीने पाहातो पण त्याला वाचनाचा जाम तिटकारा आहे तर मी यातलं काही काही निवडक त्याला वाचून दाखवलंय....I wish I had recorded that as I have returned the book already...:D
आणि मग त्या रेफ़रंसच्या मॅचेस त्याने मायाजालावरून शोधून पुन्हा पाहिल्यात....इतकं त्याचं लिखाण जबरी आहे....असो मी तर हे पुस्तक वाचून इतका मोठा सलाम ठोकला होता की त्याच्यावर लिहायला मला तर जमलंच नस्तं...या पार्श्वभूमीवर तुझी पोस्ट मस्तच आहे...होय कमेंट आवरतेय...कारण पुस्तक आवडलं तरी इतकं चर्‍हाट लावायची गरज नाही न....(बाय द वे, तुझ्या ब्लॉगवरची माझी आतापर्यंतची ही सगळ्यात मोठी कमेंट असेल का? मुळात तुझ्या अनियमित पोस्टाही बरेचदा मस्त छोट्या छोट्याच असतात ना?? मग ही तर एक अख्खी पोस्ट म्हणून खपेल...:))
असो...आतापर्यंत वाचलेल्या आत्मचरित्रापैकी सगळ्यात डिटेल्ड आणि सगळ्यात प्रामाणिक..माझ्या पुढच्या वेगास दौर्‍यात त्याची ती शाळा पाहायचं मी ठरवलंय आता देव पुन्हा वेगासला कधी नेतो माहित नाही....
आता मात्र फ़ुफ़ाटा....:)

हेरंब said...

पहिल्या आणि शेवटच्या परीच्छेदशी पूर्ण सहमत :))

मी ही वाचेन लवकरच..

Raj said...

बरेच दिवस यादीत आहे हे पुस्तक. सुरेख परिचय.
लवकर संपल्यासारखा वाटला. आणखी वाचायला आवडलं असतं.

Gouri said...

अपर्णा, मी (नेहेमीप्रमाणे) आधाश्यासारखं दोन - तीन दिवसात वाचलं पुस्तक. त्यामुळे त्यातल्या सगळ्या मॅचेसची वर्णनं वाचताना "हे शोधून परत बघितलं पाहिजे" असं वाटलं, तरी तसं करायला वेळ नव्हता मला :)
टेनिस बघायला मला आवडतं, पण मी आयुष्यात कधी टेनिसची रॅकेट हातात धरलेली नाही, किंवा या खेळाविषयी फारशी तांत्रिक माहिती मिळवलेली नाही. तरी मला हे पुस्तक आवडलंय. तसंही राजने प्रतिक्रियेत म्हटलंच आहे पुस्तकाविषयी अजून वाचायला आवडेल म्हणून - तर एक पोस्ट होऊन जाऊ देत तुझी या विषयावर!

Gouri said...

हेरंब, :) :)

Gouri said...

राज, पुस्तकाविषयी लिहितांना मला ते आवडलं की नाही हे सांगायची खूप घाई असते. त्यात पुस्तकाची माहिती लिहायची राहून जाते :) नक्की वाच पुस्तक. अतिशय प्रामाणिक आत्मकथन आहे असं हे.

Suhas Diwakar Zele said...

आप्पाने खूप आधी रेकमेंड केलं होतं, पण वाचायचा मुहूर्त आला नाही, आता तुझी पोस्ट वाचून पुस्तक घ्यावेच म्हणतो :) :)

Gouri said...

सुहास, ओपन प्रकाशित झालं तेंव्हा त्याचं खूप कौतुक झालं होतं, पण अनघाने रेकमेंड करेपर्यंत मला ते वाचावंसं वाटलं नाही. पुस्तक कितीही चांगलं असो, आपण ते पुस्तक वाचण्याची वेळ यावी लागते असं मी समजायला लागले आहे हल्ली :)

हेरंब said...

कालच विकत घेतलंय. लवकरच संपवतो.

Anagha said...

'चुकणारा, सावरणारा, पुन्हा चुकणारा एक हाडामांसाचा माणूस या पुस्तकात भेटतो, म्हणून मला ‘ओपन’ आवडलं.'

हे अगदी खरंय...आणि म्हणूनच मलाही अतिशय आवडलेलं पुस्तक आहे.

आपल्या आवडीनिवडी जुळतात ह्यावर अजून एकदा शिक्कामोर्तब झालं गं ! :) :)

Gouri said...

हेरंब, लवकर वाच, आणि परीक्षण लिही! :)

Gouri said...

अनघा, तू हे रेकमेंड केलंस आणि खांदेरीला आठवणीने आणलंस म्हणून वाचायला मिळालं मला :)

रोहन... said...

जाम शोधाशोध केली तेंव्हा आदल्या रात्री सापडले हे पुस्तक.. :) नाहीतर तू ही पोस्ट लिहू शकली नसतीस.. ;)

Gouri said...

रोहन, अगदी खरं! तू आणि शमिकाने पुस्तक शोधायचं मोठं काम केलंत म्हणून मला वाचायला ते मिळालं बरं! आणि मला ते फारच आवडलं, म्हणून ही पोस्ट :)

सिद्धार्थ said...

>> "आपल्याला आयुष्यात काय करायचंय याच्या कन्फ्युजनमध्ये आणि आपण कुवतीएवढं करून दाखवत नाही या टोचणीमध्ये मी त्याच्या अगदी जवळपासच आहे."

केवळ ह्या एका वाक्यामुळे तरी Open वाचायलाच हवे आत्ता.

Gouri said...

सिद्धार्थ, टेनिस किंवा आगासी प्रेमी नसूनही आवडेल असं आहे हे पुस्तक. नक्की वाच.