माझं लहानपण लहान गावात, भरपूर जागा, मोठ्ठं अंगण असणऱ्या घरात गेलं. कित्येक वेळा जेवायला, पाणी प्यायला सोडता आम्ही सगळा दिवस बागेतच घालवत असू. बागेतच आमचे कित्येक प्रयोग चालायचे. लोहचुंबक घेऊन मातीमधून लोखंडाचे कण गोळा करणं आणि त्या लोखंडाच्या कणांपासून वेगवेगळे आकार करणं, पानं, कचरा गोळा करून त्याचं खत बनवण्याचा प्रयत्न करणं, पावसाळ्यात गांडुळं बाहेर आली म्हणजे त्यांना उचलून गुलाबाच्या आळ्यात टाकणं असे अनंत उद्योग असायचे. समोर मंजूकडे गेलं म्हणजे तर जर्सीला खाऊ घालणं, तिची धार काढणं, ताज्या, अजून गरम असणाऱ्या शेणाने सारवणं अशी अजून इंटरेस्टिंग आयटम्सची यात भर पडायची. म्हणजे बागकामातलं काही खूप समजत होतं किंवा आम्ही लावलेली झाडं जगायचीच अशातला काही भाग नव्हता - पण बागेत एकदम ‘घरच्यासारखं’ वाटायचं एवढं मात्र खरं.
पुण्यात आल्यावर खूपच गोष्टी बदलल्या. अंगण नसणारं घर, तेही पहिल्या मजल्यावर. गावातल्या मैत्रिणी, तिथल्या गमती जश्या हळुहळू मागे पडल्या, तशीच बागसुद्धा. गॅलरीच्या टिचभर जागेत कुंड्यांमध्ये झाडं लावणं म्हणजे झाडांवरती अन्याय वाटायचा. त्यामुळे कधी रस्त्यात, कुणच्या बागेत एखादं आनंदी झाड बघितलं म्हणजे ते तेवढ्यापुरतं एन्जॉय करायचं एवढाच या सोयऱ्यांशी संबंध उरला होता.
खूप वर्षे झाडांपासून दूर राहिल्यावर परत एकदा गच्चीत छोटी का होईना, पण बाग करायची असं ठरवलं. पहिल्या दिवशी कुंड्या भरतांनाच मला पहिला धक्का बसला - माती - शेणखतात हात घालताना मला घाण वाटते आहे यावर माझा विश्वासच बसत नव्हता. माती परकी वाटावी इतकी नागर मी कधी झाले? माती मला कधीपासून ’अस्वच्छ’ वाटायला लागली? शेणा-मातीची घाण वाटल्यावर नोकरी सोडून शेती कशी करणार मी? माझ्या शाळेतल्या मुलांबरोबर बागकाम कसं करणार?
परवा खत घालताना सहजपणे मातीमधली, शेणखतातली ढेकळं हाताने फोडत होते. इतक्या वर्षांच्या विरहाने आलेला दुरावा त्या ढेकळांसारखाच हळुहळू विरघळायला लागला म्हणायचा. गाडं हळुहळू पूर्वपदावर यायला लागलं तर!
आज संध्याकाळी मस्त पाऊस झाला. गच्चीत मोठ्ठं तळं साठलं होतं. ते पाणी काढायला गेले, तर पाण्यात केवढी तरी गांडुळं. पाणी वाहून गेलं की कोरड्या फरशीवर ही मरणार. आणि सातव्या मजल्यावरच्या कुंड्यांमधल्या मातीत परत गांडुळं कुठून येणार? शांतपणे ती गांडुळं पकडून परत कुंड्यांमध्ये सोडली. गेल्या दोन महिन्यात गच्चीमध्ये कुंडीत लावलेल्या चार झाडांनी आपल्याला काय दिलंय, याची एकदम जाणीव झाली. आपल्या माणसांचे आभार मानायचे नसतात. पण जाणीव तरी ठेवायलाच हवी ना.
7 comments:
surekh lihites. :)
thanks G :)
Khare lihilys Gauri (tu/ ki tumhee?) aawdel lagech blog reader madhye add kela :)
Deep, tumhi nako - tuch mhaNat ja. he post ani ekandar blog aavadalaa mhanun chhan vaatale. pratikriyaanche swagat aahe.
पटलय तुझं.....लहान गावातच गेलेय माझेही बालपण आणि शहरात वाढलेल्यांपेक्षा कितीतरी समृद्ध....शहरातल्या गोष्टी वयाच्या कोणत्याही टप्प्यावर मिळू शकतात पण माती, दगड धोंडे, गेला बाजार कचरा यात होणारे सहज संस्कार मिळवण जास्त महत्वाचे आहे असे वाटायला लागलेय आता....
आईच्या बागकामाची आवड म्हणून लहानपणी गुलाबाला कलम करणे, झाडांना आळे करणे, रोज संध्याकाळी पाणी देणे हे काम केलेत.
खूप खूप मजा येत असायची. गेली १० वर्ष मात्र संबंध आला नाही. वाढदिवसाला लावलेलं 'कडीपत्त्याच' झाड मात्र आताही गावी गेले कि त्या जुन्या दिवसांची आठवण करून देतो.
सहजच, इतक्या दिवसांनी तुला उत्तर लिहिते आहे ... हा महेंद्रंच्या ब्लॉगेटिकेट्सचा परिणाम बरं :) शहरी गोष्टी आयुष्यात पुढे शिकता येतात - ही गंमत लहानपणीच अनुभवायला मिळायल हवी.
आनंद, खूप समाधान मिळतं झाडांच्या सहवासामधून.
Post a Comment