Wednesday, February 9, 2011

हेमलकसा

    चंदाताई आठल्ये अमेरिकेत असतात. आनंदवन, हेमलकसा, सर्च या प्रकल्पांना अर्थसहाय्य मिळवून देण्यात त्यांचा सक्रीय सहभाग असतो. शिवाय भारतात सुट्टीसाठी आलं म्हणजे त्या आवर्जून तिथे जातात, कधी हेमलकसाच्या वार्षिक सर्जरी कॅम्पमध्ये मदत, कधी आनंदवनाच्या रोजच्या कामामध्ये मदत असा प्रत्यक्ष कामात सहभागही घेतात. सर्चमधून दोन बस बदलून मी धडपडत हेमलकसाला जाणार म्हटल्यावर त्यांनी सहज म्हटलं, आम्ही उद्या हेमलकसाला जाणारच आहोत, गाडीत भरपूर जागा आहे. तू आमच्याबरोबर आलीस तर तुझा प्रवासाचा वेळ आणि त्रास वाचेल. पडत्या फळाची आज्ञा घेऊन मीही त्यांच्याच बरोबर जायचं ठरवलं. त्यांचं बोट धरून हिंडल्यामुळे त्यांच्या पुण्याईचा फायदा आपसुकच मलाही मिळाला.

    तर चंदाताईंबरोबर त्यांची बहिण, लेखिका संध्याताई कर्णिक आणि मी गडाचिरोलीहून शनिवारी सकाळी निघालो. दुपारी आम्ही हेमलकसाला पोहोचलो. गाडीतून उतरून जरा स्थिरस्थावर होतोय, तोवर एक शंभरएक शाळकरी पोरांचा लोंढा तिथे येऊन पोहोचला - प्राणी बघायला. पोरांचा कल्ला चालला होता, आणि शिक्षक फारसं मनावर घेत नव्हते. त्यांची ही दर वर्षीची ‘प्राणीसंग्रहालयाची सहल’ असावी. यापलिकडे जाणून घेण्यासारखं हेमलकसामध्ये काही आहे हे त्यांच्या गावीही नसावं. अशा ठिकाणी आपण जातो तेव्हा तिथल्या लोकांना किमान पूर्वसूचना द्यावी, त्यांची अडचण होणार नाही असं बघावं एवढं किमान पथ्य पाळणं अवघड आहे का?

    हेमलकश्याला नागपूरचे रोटरी क्लबचे डॉक्टर दरवर्षी दोन दिवसांचा सर्जरी कॅम्प घेतात. आम्ही गेलो तेव्हा सर्जरी कॅम्प नुकताच संपलेला होता. इथले पेशंट दूरदूरहून येणारे. प्रवास जिकिरीचा. पैश्याचा प्रश्न. पुन्हा गावात गेल्यावर कुठल्याच वैद्यकीय सेवा नाहीत. त्यामुळे साधं डोळ्यांच मोतीबिंदूचं ऑपरेशन असलं, तरी पेशंट सगळ्या कुटुंबाबरोबर येतात. पेशंटचे नातेवाईक बंदिस्त खोलीत राहण्यापेक्षा रुग्णालयाबाहेरच्या मोकळ्या पटांगणावर राहतात, तिथेच तीन दगडांच्या चुलीवर त्यांचा स्वयंपाक चालतो. चांगलं बरं वाटेपर्यंत त्यांची दवाखान्यातून सुट्टी होत नाही. असे बरेच पेशंट आणि नातेवाईक अजून प्रकल्पावर होते.

    दुपारच्या तळपत्या उन्हात अनिकेत आमटेनी आम्हाला प्रकल्प दाखवला. हेमलकसा हा गडचिरोलीचा अतिशय दुर्गम आणि मागास भाग. अजूनही पवसाळ्यात ओढ्याला पूर आला म्हणजे हेमलकश्याचा बाहेरच्या जगाशी संबंध तुटतो. इथे कामाला सुरुवात केली तेव्हा फक्त जंगल होतं - वीज नाही, रस्ते नाहीत, डोक्यावर छप्परसुद्धा नाही. डॉक्टर आमटे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी अक्षरशः शून्यातून हे सगळं उभं केलेलं आहे. इथल्या आदिवासींना त्या काळात शेती माहित नव्हती. शिकार किंवा जंगलात मिळणारी फळं, कंदमुळं हे त्यांचं खाणं. वाघ, अस्वल, चिमणी, उंदीर जो मिळेल तो प्राणी शिकार करून खायचा ही पद्धत. एवढी शिकार झाली होती, की इथे कामाला सुरुवात झाली तेव्हा जंगलात चिमणीचा आवाजसुद्धा यायचा नाही - सगळे पक्षी मारून खाल्लेले. कधीकधी शिकार करताना आईबरोबर लहान लहान पिल्लं सापडायची, आदिवासी तीही खाऊन टाकायचे. अन्नाचं दुर्भिक्ष्यही होतं, आणि इतकं लहान पिल्लू एकट्याने जंगलात जगणंही शक्य नसायचं. अशी लहान पिल्लं जर तुम्ही इथे आणून दिली, तर त्यांच्या बदल्यात आम्ही तुम्हाला अन्नधान्य देऊ असं डॉक्टर आमट्यांनी आदिवासींना सांगितलं - आदिवासींनी आणून दिलेली वेगवेगळ्या प्राण्यांची पिल्लं त्यांनी जिवापाड सांभाळली - त्यातून प्रकल्पावरचं प्राण्यांचं अनाथालय उभं राहिलं आहे. त्यामुळे इथल्या प्रत्येक प्राण्याची कथा हीच - आईवेगळं लहान पिल्लू, इथे मोठं झालेलं, जंगलामध्ये आज स्वतंत्रपणे जगू शकणार नाही म्हणून आजही इथेच राहणारं. या प्राण्याचा खर्च भागवण्यासाठी सरकारी अनुदान नाही. सरकारी प्राणीसंग्रहालयं या प्राण्यांची काळजी घेऊ इच्छित नाहीत, उलट कधीकधी तेच इथे प्राणी आणून सोडतात. वन्यप्राणीविषयक कुठले कुठले कायदे लावून प्रकल्पाला धारेवर मात्र धरलं जातं. आजही या प्राण्यांचा खर्च वैयक्तिक देणगीदारांकडून मिळणार्‍या देणग्यांमधून होतो. इतक्या वर्षांच्या प्रयत्नांनंतर आता अशा शिकारीचं प्रमाण कमी झालंय. एके काळी महिन्याला १०-१२ पिल्लं इथे आणली जायची, आता वर्षाला १०-१२ येतात.

    प्रकल्पावर सुमारे ६०० मुलामुलींची निवासी शाळा आहे. शाळेत शिकून पुढे आलेली इथली आदिवासी मुलं आज उच्च शिक्षणही घेताहेत. मुलींची संध्याकाळची प्रार्थना बघायला आम्ही त्यांच्या वसतीगृहावर गेलो. नव्या वसतीगृहाची इमारत बघितली. प्रत्येक मोठ्या खोलीत १५- २० बंक बेड, आणि फळीवर मुलींच्या ओळीने लावून ठेवलेल्या प्लॅस्टिकच्या थैल्या. प्रत्येकीचं सामान बस एवढंच. शहरात शाळेत जाणार्‍या माझ्या भाचरांना एकदा इथे शिकणार्‍या मुलींच्या आयुष्यात डोकवायला मिळालं पाहिजे असं वाटलं. एवढ्या थंडीत स्वेटर नाही, चपला नाहीत म्हणून कुडकुडत मेसला जाणार्‍या वर्गमैत्रिणी त्यांच्या उच्चाभ्रू शाळेत कश्या सापडणार?

    संध्याकाळच्या चहाला पुन्हा चंदाताईंच्या पदराला धरून इथले प्रकल्पावरचे एक जुने कार्यकर्ते बबनभाऊ पांचाळ यांच्या घरी जायला मिळालं. बबनभाऊ इथल्या दवाखान्याचे ‘नारायण’ आहेत. शेजारच्या छोट्या सिद्धीचं या आजोबांशिवाय पान हलत नाही. सूर्यास्त बघायला त्यांच्याबरोबर इंद्रावती नदीच्या संगमावर गेलो होतो, तेव्हा सिद्धीची कहाणी समजली. सिद्धीचा बाबा हा आश्रमाच्या शाळेत शिकून पुढे आलेला पहिला दंतवैद्य. दुर्दैवाने सिद्धीच्या जन्माआधीच त्याचा साप चावून अपघाती मृत्यू झाला, आणि पोटातल्या बाळासकट बायको उघड्यावर पडली. घरचा फारसा आधार नाही, पदरी येऊ घातलेलं मूल. तीही प्रकल्पावरच्या शाळेचीच विद्यार्थिनी. तिला मग इथल्याच दवाखान्यात काही काम लावून दिलं, आणि बबनभाऊ तिच्या मुलीचे - सिद्धीचे आजोबा झाले. या नात्यातली सहजता खूप भावली. चंदाताईंबरोबर अजून एका जुन्या कार्यकर्त्यांशी बोलताना असंच त्यांच्याकडून ऐकायला मिळालं ... एक मुलगी वाढवायची म्हणते आहे. बाबांनी एक आदिवासी मुलगी मोठी केली, प्रकाशभाऊ - विलासभाऊंनीही एकेक मुलगी दत्तक घेतली. मलाही एका मुलीला मोठं करायचंय! या सगळ्या कार्यकर्त्यांची आपल्याला माहिती नसते. त्यांना कुणी पुरस्कारांनी सन्मानित करत नाही. काम मोठं झालं तरी ते बिनचेहर्‍याचेच राहतात. मी तर प्रकाशभाऊ-मंदाताई भेटणार नाहीत म्हटल्यावर इथे येऊच नये असा विचार करत होते ... चंदाताईंमुळे हेमलकसाचं अंतरंग थोडंफार बघायला मिळालं.

*************************************************************

    हेमलकश्याच्या शाळेला आज किमान २० संगणकांची गरज आहे. आपण या बाबतीत नक्कीच मदत करू शकतो. हा निधी उभा करण्यासाठी तुमचा सगळ्यांचा सहभाग हवाय. या प्रकल्पाच्या कामातला आपला खारीचा वाटा उचलू या!

प्रकल्पाचा पत्ता आणि अन्य माहिती:

http://lokbiradariprakalp.org/
aniketamte@gmail.com

लोक बिरादारी प्रकल्प, हेमलकसा
मु.पोस्ट भमरागड
जिल्हा गडचिरोली
पिन ४४२ ७१०

फोन नंबर: +९१ ७१३४ २२०००१
फॅक्स: +९१ ७१३४ २२०११२

डॉ. प्रकाश आमटे - 9423121803
श्री. अनिकेत आमटे - 9423208802
डॉ. दिगंत आमटे - 9421782993

*************************************************************
हे हेमलकसाचे काही फोटो ... मंडळी, कालच्या सर्चवरच्या पोष्टीतही खाली फोटू आहेत - मी त्याचा उल्लेख करायची विसरले आहे :(


19 comments:

Pankaj - भटकंती Unlimited said...

जल्ली मेली आमची भटकंती. ही तुमची खरी भटकंती.

Gouri said...

पंकज, सद्ध्या गडकिल्ल्यांची भटकंती मला शक्य नाहीये ... पण या भटकंतीमध्ये एक वेगळं समाधान मिळतं हे मात्र खरं.

THEPROPHET said...

सहीच..हेमलकसाबद्दल पूर्वीही बरंच वाचलेलं होतं......!! तुझ्याकडून अजूनही बरंच काही कळलं!

Gouri said...

विद्याधर, तरी प्रकाश आमटे - मंदाताईंशी भेट झाली नाही तिथे ... नाही तर अजूनही काही नवं समजलं असतं असं वाटतं.

aativas said...

मी एकदाच जाऊन आले तिथे. पण माझी एक मैत्रीण तिथे काही महिने जाऊन राहिली होती. तिच्याकडून खूप काही ऐकल आहे तिथल्या कामाबद्दल.

Gouri said...

सविता, तिथे खरंच काही महिने तरी राहिलं पाहिजे तर आपण कामात सहभागी होऊ शकतो.

सिद्धार्थ said...

सर्च आणि हेमलकसा दोन्ही पोस्ट वाचल्या. सुंदर अनुभव. डॉक्टर अभय आणि राणी बंग आणि आमटे कुटुंबाचे कार्य पाहिलं की आपल्यामध्ये फार उणीव आहे असं वाटत. जाता-येता यंत्रणेला आणि भ्रष्ट राजकारण्यांना दोष देण्याव्यतिरिक्त आपण काय करू शकतो ह्याची ज्वलंत उदाहरणं आहेत ही कुटुंब.
कधी कधी वाटतं मी आयुष्याच्या शेवटी मागे वळून पाहेन तेंव्हा माणूस म्हणून जन्माला आल्याचे सार्थक झाले असे वाटेल का? खरच एकदा तरी तिथे जाऊन त्यांच्या कामात थोडं तरी सहभागी झालं पाहिजे. त्यात जे समाधान मिळेल ते अवर्णीय असेल.

Anonymous said...

गौरी काय बोलावे गं.... मस्तच ....

Gouri said...

सिद्धार्थ, त्यांचं काम बघताना आपल्याला या कामाला काही हातभार लावता येईल का हा विचार मनात कुठेतरी होता. दोन - चार दिवस तिथे जाऊन त्यांना फारशी मदत होत नाही. काही महिने काढायला हवेत त्यासाठी. जेव्हा आजुबाजूची परिस्थिती बघून निराश वाटतं, तेंव्हा या लोकांची आठवण काढायची - खूप दिलासा मिळतो!

Gouri said...

तन्वी, अग काय योगायोग आहे बघ - आज बाबा आमटेंचा स्मृतीदिन. मला हे आताच समजलं ... नेमकं आज त्यांच्या हेमलकश्याच्या स्वप्नाविषयी मला लिहायची बुद्धी झाली!

Mahendra Kulkarni said...

छान आहे पोस्ट! :)बरेच दिवस झालेत जाऊन. एकदा जायला हवं!

Gouri said...

महेंद्रकाका, तुम्ही मागे आनंदवनाविषयीही लिहिलं होतं - तिथे जायचं याहून गेलं या सुट्टीत. आनंदवन आनि हेमलकसा तुमच्या वरोरा - चंद्रपूर वगैरेच्या जवळच आहे - तुम्ही अनेक वेळा बघितलं असेल ना!

हेरंब said...

गौरी,

स ला म !!

अजून काही लिहीत नाही !

Gouri said...

हेरंब, खरंच तिथे वर्षानुवर्ष टिकून राहून अशी कामं उभी करणार्‍या कार्यकर्त्यांना सलाम!

अपर्णा said...

तिथे खरंच काही महिने तरी राहिलं पाहिजे +++++++++++++++++++++++++++

Gouri said...

अपर्णा, अग हे सगळं बघून पुढे आपण काही केलं तर उपयोग. नाही तर एन जी ओ टूरिझम नावाचा एक प्रकार चाललाय सद्ध्या या भागात. म्हणजे ट्रॅव्हल कंपनी अशी चांगली चांगली कामं तुम्हाला दाखवते - प्रेक्षणीय स्थळं बघितल्यासारखं. यात तुम्हाला काम बघितल्याचं समाधान, ट्रॅव्हल कंपनीचा फायदा, आणि कामाला मात्र उगाचच गर्दी करणार्‍यांचा उपद्रव. असं नको व्हायला.

मकरंद राऊत said...

क्षमा असावी मी आपली पूर्वपरवानगी न घेताच हि पोस्ट माझ्या ब्लोगवर टाकली ......
पण हि माहिती मला माझ्या EMAIL मध्ये मिळाली होती. मला वाटले कि हि माहिती इथे द्यावी म्हणून मी इथे ती प्रसिद्ध केली.

मकरंद राऊत said...

mi post delete keli ahe ... aapan pahu shaktat .... :)

Gouri said...

मकरंद, ब्लॉगवर स्वागत. ही माहिती जितक्या जास्त लोकांपर्यंत पोहोचेल तेवढं चांगलंच आहे. आपल्या ब्लॉगवर टाकताना मूळ ब्लॉगकाराची पूर्वपरवानगी घेण्याचं आणि तसा उल्लेख करण्याचं पथ्य मात्र पाळायला हवं.